होमपेज › Goa › पणजी स्मार्ट सिटीसाठी तीन कोटींचा प्रोत्साहन निधी 

पणजी स्मार्ट सिटीसाठी तीन कोटींचा प्रोत्साहन निधी 

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 11:28PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

पणजी स्मार्ट सिटी करण्यासाठी 15 जानेवारीपासून मनपाच्या मदतीने घरोघरी जाऊन  पणजीवासीयांच्या अडचणींविषयी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. पणजी स्मार्ट सिटी करण्यासाठी राज्य सरकारकडून उत्तम कामगिरी केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून  3 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी पुरस्कार स्वरुपात मिळाला आहे, अशी  माहिती  इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे अध्यक्ष  तथा माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कुंकळ्येकर म्हणाले, की वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा मिळण्यास पणजीवासीयांना होणार्‍या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहे. त्यानंतर  स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत त्यात सुधारणा केली जाईल. मुलभूत सुविधा सर्वांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने हे सर्व्हेक्षण केले जात आहे. 

स्मार्ट सिटीसाठी मिळालेला 3 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी 26 जानेवारी रोजी  मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाईल. स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडून 1 हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 111 कोटी रुपयांचा निधी प्राप्‍त झाला आहे. अमृत योजनेअंतर्गत पणजी शहरातील विविध विकासकामे करण्यासाठी 209 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी  36 कोटी रुपये प्राप्‍त झाले आहे. हा निधी खर्च करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी  दिला आहे. पणजी स्मार्ट सिटी लोगो स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेतील विजेत्याला  26 जानेवारी रोजी पुरस्कार दिला जाईल, असे कुंकळ्येकर यांनी सांगितले.

सांतिनेझ खाडीतील गाळ उपसण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.  पणजी-बेती मार्गावर पूल उभारावा की  त्या जलमार्गावरील फेरी बोटींच्या संख्येत वाढ करावी, या प्रस्तावावर सध्या विचार सुरु आहे. नव्या मळा पुलावर दुहेरी वाहतूक सुरु करण्याचीही नागरिकांकडून मागणी केली जात आहे, असे कुंकळ्येकर यांनी सांगितले. इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी  डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंदिप्‍ता पाल चौधरी उपस्थित होते.