Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Goa › नागेशी-बांदोडा तळीत तीन मुलांचा बुडून मृत्यू

नागेशी-बांदोडा तळीत तीन मुलांचा बुडून मृत्यू

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 1:17AMफोंडा : प्रतिनिधी 

नागेशी-बांदोडा येथील नागेश देवस्थान समोरील तळीत बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बहीण-भावांसह 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला. आदिती वेंकटेश भट (13) तिचा भाऊ भुवनेश्‍वर (8) व श्रावण बाळकृष्ण होला (7, सर्वजण रा. गुरुपूर, मंगळुरू-कर्नाटक) येथील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळुरू येथील प्रदीप भट हे आपल्या दोन विवाहित मुली व नातवंडांसह मंगळवारी गोव्यात देवदर्शनासाठी आले होते. बुधवारी संध्याकाळी नागेश देवस्थानात देवदर्शन घेतल्यानंतर लहान मुले तळीच्या  परिसरात खेळत होती. अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. याच घाईत मुले बाहेर सुरक्षित आहेत, असे त्यांच्या मातांना वाटले. मात्र, त्याचवेळी तेथे खेळणारी आदिती, भुवनेश्‍वर व श्रावण ही लहान मुले तोल जाऊन तळीत पडली आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. तिन्ही मुलांना तेथे उपस्थित असणार्‍यांनी पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती तिन्ही मुलांना मृत घोषित केले. 

आदिती व भुवनेश्‍वर भट यांचे वडील वेंकटेश व श्रावणचे वडील बाळकृष्ण हे दोघेही साडू असून  ते दोघेही देवदर्शनासाठी गोव्यात आले नव्हते. त्यामुळे मुलांच्या मृत्यूबाबतची घटना कळाल्यानंतर ते रात्रीच गोव्याकडे येण्यासाठी रवाना झाले.  

आदिती भट ही यंदा आठवीत, भुवनेश्‍वर भट चौथीच्या वर्गात तर श्रावण होला हा दुसरीच्या वर्गात शिकत होता. मुलांच्या मृत्यूनंतर दोन्ही मातांनी इस्पितळात हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी पंचनामा केला.