Fri, Mar 22, 2019 01:31
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › राज्यातील तिन्ही खासदार आज गडकरी-शहा यांना भेटणार

राज्यातील तिन्ही खासदार आज गडकरी-शहा यांना भेटणार

Published On: Mar 12 2018 1:04AM | Last Updated: Mar 11 2018 11:58PMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आलेल्या खाणबंदीच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे तिन्ही भाजप खासदार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून राज्याला भेट देण्यासाठीचे आमंत्रण देणार आहेत. तसेच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही सोमवारी (दि.12) भेटणार असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली. 

गेल्या आठवड्यात 5 मार्च रोजी राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने गडकरी तसेच  ऊर्जामंत्री पियूष गोयल यांची खाणबंदीबाबत भेट घेतली होती. मात्र, या शिष्टमंडळाला केंद्राकडून कोणतेही मदतीचे आश्‍वासन मिळाले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खाणींच्या लिजेस रद्दबातल ठरवून येत्या 15 मार्चपासून खनिज उत्खननाला बंदी घातली आहे. तसेच यापुढे सर्व खाणींचा लिलाव करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. 

आता या विषयावर भाजपचे तिन्ही खासदारांचे शिष्टमंडळ केंद्राचे मन वळवण्याचे प्रयत्न करणार आहेत. लोकसभा खासदार श्रीपाद नाईक आणि नरेंद्र सावईकर यांच्यासमवेत राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर आता सोमवारी केंद्रीय नेत्यांना भेटणार आहेत. तेंडुलकर भाजपचे प्रदेशाध्यक्षही आहेत. 

याविषयी तेंडुलकर म्हणाले की, खाण व्यवसायावर आलेल्या संकटावर केंद्राकडून हस्तक्षेप करण्याच्या मागणीसाठी आम्ही तिन्ही खासदार सोमवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांची दिल्लीत भेट घेणार आहोत.शिष्टमंडळाकडून गडकरी यांना राज्यात स्वत: येऊन भाजप घटक पक्षातील तथा युती पक्षातील आमदारांना भेटण्याचे आमंत्रण दिले जाणार आहे. याशिवाय भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेऊन त्यांना गोव्यातील परिस्थितीची माहिती दिली जाणार आहे.