Thu, Aug 22, 2019 03:56होमपेज › Goa › पर्यटकांच्या संख्येत यंदा वाढ

पर्यटकांच्या संख्येत यंदा वाढ

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:35PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

पर्यटन हंगामात यंदा पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून डिसेंबर महिन्यात राज्यातील विविध  भागातून लोकांच्या सहकार्यामुळे  पर्यटन हंगाम यशस्वी ठरला. येत्या काही दिवसांत राज्यात कार्निव्हल, शिमगो व अन्न आणि संस्कृती महोत्सवास पुन्हा पर्यटकांची गर्दी होणार असून गोवा या महोत्सवांसाठी सज्ज आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे, की नाताळ व नववर्षानिमित्त राज्यात मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना योग्य सेवा पुरविण्यासाठी, यशस्वीरित्या व्यवस्थापनात राज्यातील व्यावसायिक, लोकांचे सहकार्य व समर्थन लाभले. येणार्‍या महोत्सवांमध्ये पर्यटकांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षीत असून लोकांनी सहभागी व्हावे. 

पोलिस खाते, राज्यातील प्रशासकीय आस्थापने, गोमंतकीय नागरिकांनी पर्यटन हंगामास सहकार्य केल्याबद्दल, पर्यटकांना दिलेल्या आदरातिथ्याबाबत आजगावकर यांनी सर्वांचे आभार मानले. येत्या काही दिवसांत होणार्‍या महोत्सवा दरम्यानही सर्वांकडून अशाच सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. गोवा नेहमी आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा यशस्वी पर्यटन हंगामानंतर गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचे अधोरेखित झाले आहे. पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात पर्यटकांची संख्या वाढली असून लवकरच पर्यटन विभागाकडून या विषयी सविस्तर माहिती दिली जाईल, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पर्यटकांना सर्व ठिकाणांवर मूलभूत सोयी उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने पर्यटन विभागाचे काम सुरू असून पर्यटकांनीही राज्यातील नियमांचे पालन करण्याचे पत्रकाद्वारे मंत्री आजगावकर यांनी केले आहे.