होमपेज › Goa › तिसर्‍या मांडवी पुलाचे काम जूनमध्ये पूर्ण: कुंकळ्येकर

तिसर्‍या मांडवी पुलाचे काम जूनमध्ये पूर्ण: कुंकळ्येकर

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 11:54PMपणजी : प्रतिनिधी

पणजी शहराच्या पायाभूत साधनसुविधांमध्ये मोठी भर टाकणार्‍या तिसर्‍या मांडवी पुलाचे 76 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या जून महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. मांडवी नदीतील एकूण चार केबल स्टेडखांबांपैकी दोन खांबांचे काम पूर्ण झाले असून ऑगस्ट महिन्यात या पुलाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती गोवा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली आहे. 

मांडवी नदीवर सध्या दोन पूल आहेत. मात्र, म्हापसाहून पणजीत येणारी व म्हापसाहून पणजीमार्गे फोंडा, मडगाव आणि वास्कोला जाणारी वाहतूक वाढली आहे. या वाढत्या वाहतुकीमुळे पणजीत वाहनांची संख्या वाढत असल्याने पणजी बसस्थानकालगतच्या सर्कलजवळ वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून तिसर्‍या मांडवी पुलाची कल्पना 2012 साली पुढे आली. ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनी’ला सुमारे साडेचारशे कोटी रुपयांना या कामाचे कंत्राट दिले गेले होते. काम सुरू झाल्यानंतर पहिली दोन वर्षे कामाचा वेग थोडा कमी होता. गेल्या मार्च 2017 मध्ये मनोहर पर्रीकर पुन्हा मुख्यमंत्री बनल्यानंतर कामाने वेग घेतला.  या पुलाचा खर्च वाढून तो सुमारे 880 कोटी रुपये झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या विषयी कुंकळ्येकर यांनी सांगितले की, आता पुलाचे 75-76 टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ 25 टक्के काम उरले असून ते काम येत्या पाच ते सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. तिसर्‍या पुलामुळे  मांडवीवरील पहिल्या व दुसर्‍या पुलावरील भारदेखील कमी होणार आहे.  राष्ट्रीय हरित लवादाकडे काही महिने या पुलाच्या कामाबाबतचा एक खटला चालला होता. पुलाचे डिझाईन काहीवेळा बदलावे लागल्याने  खर्चात वाढ झाली. कामाला पाच-सहा महिन्यांचा विलंब लागला असला तरी आता सर्व अडचणी दूर झाल्याने हे काम लवकरच पूर्ण होणार आहे.