Sat, Apr 20, 2019 07:53होमपेज › Goa › विधानसभा संकुलात अन्य कुणाचाही पुतळा नको

विधानसभा संकुलात अन्य कुणाचाही पुतळा नको

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 23 2018 1:15AMपणजी : प्रतिनिधी

बहुतांश गोमंतकीयांच्या मागणीनुसार  गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारण्यात आला आहे. बांदोडकर यांच्याव्यतिरिक्‍त अन्य कोणाचाही पुतळा विधानसभेच्या प्रांगणात उभारण्याच्या मागणीला समर्थन न देण्याचा ठराव प्रदेश भाजप पदाधिकार्‍यांच्या सोमवारी झालेल्या गाभा समिती बैठकीत एकमताने घेण्यात आला.

भाजप विधिमंडळ गटाची बैठक गेल्या आठवड्यात झाली होती. पर्वरी विधानसभा संकुलात  सध्या डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्याबाबत होत असलेल्या मागणीबद्दल त्या बैठकीत चर्चा करण्यात आली नव्हती. हा वादाचा मुद्दा सोमवारी झालेल्या गाभा समितीच्या बैठकीत विचारात घेण्यात आला व त्यावर ठराव घेण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजप कार्यालयात झालेल्या  या बैठकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनय तेंडुलकर तसेच बहुतांश भाजप  मंत्री, आमदार आणि पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत बहुजन समाजाचे नेते मानले जात असलेल्या भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा जनतेमधून झालेल्या उत्स्फूर्त मागणीनुसार उभारण्यात आला होता, असे नमूद करण्यात आले. जनमत कौलानंतर गोमंतकीय जनतेने बांदोडकर यांच्याबद्दल असलेला विश्‍वास, आदर दर्शवण्यासाठी आणि प्रेमाची पावती म्हणून त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसविले.

जनतेच्या भावनांचा भाजपला पूर्ण आदर असून त्यांच्या भावना दुखावणारे कोणतेही कृत्य भाजप कार्यकर्ते करणार नाहीत.  गोव्याच्या मुक्‍ती लढ्यात, जनमत कौलात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात अनेक नेत्यांचे योगदान आहे. या नेत्यांचेही पुतळे विधानसभा संकुलात उभारण्याची मागणी भविष्यात येण्याची शक्यता असल्याने आणखी  कोणाचाही पुतळा न उभारण्याचा ठराव घेतला असल्याचे प्रदेश भाजपचे सरचिटणीस तथा प्रवक्‍ते सदानंद तानावडे यांनी सांगितले.

अनेकांचे योगदान

भाजपने घेतलेल्या ठरावात म्हटले आहे की, गोव्याची स्वतंत्र ओळख व अस्तित्व राखण्यासाठी अनेक नेत्यांनी योगदान दिले आहे. जनमत कौलाचा इतिहास आणि गोवा मुक्‍ती लढा भावी पिढीला समजावा यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. 

आमच्या मागणीवर ठाम : सरदेसाई.

आपण आणि आपला गोवा फॉरवर्ड पक्ष भाजप आणि भाजपच्या गाभा समितीच्या सोमवारच्या बैठकीतील ठरावामुळे निराश झालो आहोत, असे कृषिमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई  यांनी सांगितले. ते म्हणाले, इतरांचा निर्णय काहीही होवो, आमच्या भूमिकेत आता बदल होणे शक्य नाही. डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात पुढच्या जनमत कौलाआधी उभारण्याबाबत जनतेची मागणी आधी दिलेल्या वचनानुसार पूर्ण करण्यास आम्ही बांधील आहोत. या संदर्भात भाजपचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार, असेही ते म्हणाले.