होमपेज › Goa › विधानसभा परिसरात अन्य पुतळा नको

विधानसभा परिसरात अन्य पुतळा नको

Published On: Jan 19 2018 1:50AM | Last Updated: Jan 18 2018 11:03PMपणजी : प्रतिनिधी

गोवा विधानसभेत आणखी कुणाचाच पुतळा उभा केला जाऊ नये. जनमत कौलाचे राजकारण नको. स्व. डॉ. जॅक सिक्वेरा यांच्यापेक्षाही जनमत कौल चळवळीत मोठे योगदान दिलेले अनेक नेते आणि स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांचे कायम स्मरण राहावे म्हणून सरकारने  2 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे एक उद्यान विकसित करून तिथे स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळेही बसविवण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. 

येथील पर्यटन भवनात पत्रकारांशी अनौपचारीकरित्या बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले, की सध्या जास्त चर्चा ही स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाविषयी व्हायला हवी. स्वातंत्र्यसैनिकांनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेऊन जे योगदान  दिले आहे ते खूप मोठे आहे. अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे कायम स्मरण राहावे म्हणून 2 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे एक उद्यान सरकारने विकसित करावे व तिथे सगळी माहिती व छायाचित्रे उपलब्ध करावीत. तसेच स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळेही तिथे बसविले जावेत. गोवा विधानसभा परिसरात कुणाचा पुतळा नको असा निर्णय यापूर्वी झालेला आहे. डॉ. सिक्वेरा यांच्यापेक्षाही मोठे योगदान दिलेले गोमंतकीय जमनत कौल चळवळीत होते.  

आमचे कुटुंब मगो पक्षात असूनही जनमत कौलाच्यावेळी मतदान करताना मात्र विलिनीकरणाच्या विरोधात केले. जनमत कौल चळवळीत जे होते, त्यांच्यापैकी अनेकांचा गोवा मुक्तिसंग्रामात सहभाग नव्हता. तसेच गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त होऊच नये, असेही त्यापैकी अनेकांना वाटत होते, असे ढवळीकर यांनी सांगितले.

राज्यात खरा  विकास ‘मगोने’च केला : ढवळीकर

मगो पक्षाने अनेक वर्षे  स्वतंत्रपणे राज्य चालविले होते. मात्र त्यानंतर अनेकांनी मिळून युतीचे सरकार स्थापन केले होते. मगोपने कसेल त्याची जमीन, कुळांना हक्क असे कायदे आणले. सिबा, एमआरएफ, एमपीटी विस्तार असे अनेक औद्योगक प्रकल्प मगोपच्या राजवटीत आले. संजीवनी साखर कारखानाही उभा राहिला. मगोपच्या सरकारचे गोव्यात फार मोठे योगदान असून तसा औद्योगिक विकास आजपर्यंत कोणतेही सरकार करू शकले नाही, असे  मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.