Wed, Jul 24, 2019 06:26होमपेज › Goa › बायणा किनार्‍यावरील ३२ घरे पाडली 

बायणा किनार्‍यावरील ३२ घरे पाडली 

Published On: Jan 19 2018 1:50AM | Last Updated: Jan 18 2018 11:25PMदाबोळी : प्रतिनिधी

सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून काटे बायणात उभारण्यात आलेल्या 121 पैकी 32 घरे गुरूवारी दक्षिण गोवा प्रशासनातर्फे पाडण्यात आली. एकूण 38 घरांवर कारवाई करण्यात यावयाची होती, मात्र 6 घरांच्या मालकांनी तात्पुरती स्थगिती मिळवल्याने ती गुरूवारच्या कारवाईत बचावली.

32 घरांपैकी 10 घरे बुलडोझरने हटवण्यात आली, तर उर्वरीत 22 घरांवर कर्मचार्‍यांना हातोडी मारुन कारवाई करावी लागल्याने सदर   कारवाईला चक्क साडेनऊ तास लागले.
मुरगाव मतदारसंघातील बायणा समुद्र किनार्‍यावर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बांधलेली घरे गेल्या तीन वर्षापासून बायणा समुद्र किनार्‍याच्या सौंदर्यीकरणास अडथळा ठरत होती. तसेच समुद्री लाटांपासून या घरांना धोका निर्माण झाला होता.

त्यामुळे  टप्याटप्याने ती तेथून हटविण्याचा निर्णय झाला आहे. आजपर्यंत 350 हून अधिक घरांवर दक्षिण गोवा प्रशासनाने कारवाई केली असून 121 घरे सुरक्षित होती. त्यातील 32 घरे गुरूवारी पोलिस संरक्षणात पाडण्यात आली.  सदर घरांच्या मालकांना 15 दिवसांपूर्वी अंतिम नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.