होमपेज › Goa › गांजे उसगावात पोलिस बंदोबस्तात टॉवरचे काम सुरू

गांजे उसगावात पोलिस बंदोबस्तात टॉवरचे काम सुरू

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 19 2018 1:34AMफोंडा : प्रतिनिधी 
गांजे उसगाव येथे मोबाईल टॉवरला विरोध दर्शविणार्‍या ग्रामस्थांना अटक करून पोलिस बंदोबस्तात टॉवरचे काम सुरु करण्यात आले. फोंडा पोलिसांनी 23 ग्रामस्थांना अटक केल्यात 11 पुरुष व 12 महिलांचा समावेश आहे. पंचायतीने टॉवर उभारण्यात दिलेल्या परवानगीमध्ये सर्वे क्रमांक नमूद करण्यात आला नसल्याने व देवीच्या पालखीच्या वाटेवर व गणपती विसर्जन करण्याच्या ठिकाणी ग्रामस्थांनी टॉवर उभारण्यात विरोध केला होता. मात्र, त्या ठिकाणी टॉवर उभारण्यासाठी पंचायतीचे सरपंच अस्मिता गावडे यांनी पोलिस बंदोबस्त मागितल्याने संताप व्यक्त केला आहे. 

अटक केल्यात जितेंद्र गावकर (48), सुदेश गावकर (38), उगम गावकर (31), योगेश गावकर (38), प्रणय गावकर(31), सुनील गावकर (37), विजय गावकर (42), विराज गावकर (35), विवेकानंद गावकर (38), रामकृष्ण गावकर(60), दत्त गावकर (65), सुरेख गावकर (60), रेखा गावकर (46), सुनीता गावकर (55), सीमा गावकर (42), उर्मिला गावकर (48), सपना गावकर (33), स्नेहा नाईक (45), लता गावकर (48), करिष्मा गावकर (28), शेवंती गावकर (50), हेमावती गावकर (45) व नीता गावकर यांचा समावेश आहे. 
गांजे येथे टॉवरची गरज ओळखून काही ग्रामस्थांनी टॉवरची मागणी केली होती. मात्र, काही ग्रामस्थांनी टॉवर उभारण्याच्या जागेला विरोध केला होता. टॉवर उभारण्यात येणार्‍या जागेवरून देवीची पालखी जाते, तसेच गणपती विसर्जन करण्याची वाट असल्याने काही ग्रामस्थ त्याठिकाणी टॉवर उभारण्यात विरोध करीत होते. बुधवारी सकाळी पोलिस बंदोबस्त घेऊन टॉवर उभारण्याचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी त्यात अडथळा आणला. त्यामुळे पोलिसांनी  ग्रामस्थांना अटक केली. फोंड्याचे संयुक्त मामलतदार अबीर हेदे, पोलिस निरीक्षक हरीश मडकईकर व अन्य पोलिस, जिओ कंपनीचे कंत्राटदार उपस्थित होते. 

 संयुक्त मामलतदार अबीर हेदे व निरीक्षक हरीश मडकईकर यांनी ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेऊन टॉवरसाठी निवडलेली जागा योग्य नसल्याचे निर्देशनात आणून दिले. टॉवर गावातील अन्य जागेवर उभारण्याची मागणी केली. पंचायतीने टॉवरला परवानगी देताना जागेचा सर्वे क्रमांक नमूद केला नसल्याने काम बंद करण्याची मागणी केली होती. परंतु ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन काम रोखण्याचा प्रयत्न केल्यावर ग्रामस्थांना अटक करण्यात आली.  

आत्मा गावकर यांनी गावात टॉवर पाहिजे. मात्र, देवीच्या पालखीच्या व गणपती विसर्जनाच्या वाटेवर टॉवर उभारण्यात विरोध आहे. टॉवर पंचायतीने गावातील लोकांना विश्वासात न घेता परवानगी दिली असल्याचे सांगितले.

सरपंच अस्मिता गावडे यांनी ग्रामस्थांनी टॉवरची मागणी केल्यामुळे टॉवर उभारण्यात परवानगी दिली. मात्र, टॉवर उभारण्याच्या जागेला कमी लोकांचा विरोध असल्याने त्यांचा विचार केला नसल्याचे सांगितले. 

दरम्यान, विरोध करणारे ग्रामस्थ लवकरच टॉवरच्या स्थगिती मिळविण्याची तयारी करीत आहे. टॉवर उभारण्यात विरोध असल्यास अधिक तर ठिकाणी कंत्राटदार पोलिस बंदोबस्ताची मागणी करतात. मात्र, गांजे येथे टॉवर उभारण्यासाठी सरपंच यांनीच पोलिस बंदोबस्ताची मागणी केल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.