होमपेज › Goa › वाहतूक खाते ऑक्टोबरपासून कॅशलेस

वाहतूक खाते ऑक्टोबरपासून कॅशलेस

Published On: Jun 21 2018 1:25AM | Last Updated: Jun 20 2018 11:53PMपणजी : प्रतिनिधी

वाहतूक खाते आता कॅशलेस होणार आहे. त्यानुसार 1 हजार रुपये व त्याहून अधिक रुपयांवरील सर्व व्यवहाराची रक्‍कम 1 ऑक्टोबरपासून डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे स्वीकारली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दिली.

देसाई म्हणाले, की वाहतूक खात्याने प्राथमिक स्तरावर कॅशलेस व्यवहाराची सुविधा  एच.डी.एफ.सी बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत 9 एप्रिल 2018 पासून लागू केली आहे. कॅशलेस  व्यवहारासाठी सर्व  सहायक  वाहतूक संचालकांना नागरिकांमध्ये शुल्क, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे पॉस मशीनच्या माध्यमातून जमा करावे, याबाबत जागृती करावी, असे निर्देश दिले आहेत. वाहतूक खात्याचे सर्व व्यवहार 100 टक्के  कॅशलेस करण्यावर भर असेल.

एक हजार रुपये व त्याहून अधिक रुपयांवरील सर्व व्यवहाराची रक्‍कम  डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे स्वीकारली जाणार आहे. खात्यात  येणार्‍या एखाद्या व्यक्‍तीकडे शुल्क जमा करण्यासाठी डेबिट कार्ड किंवा  क्रेडीट कार्ड नसेल तरच  ती रोख स्वरुपात जमा केली जाणार असल्याचे चलन खात्याकडून जारी केले जाईल. त्याचबरोबर त्याची नोंदणी  खात्याच्या   ईडीडीओ या सॉफ्टवेअरमध्येही केली जाईल, असे देसाई यांनी सांगितले.

खात्याकडून  शुल्काची रक्‍कम  कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान स्वीकाली जाईल.   डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्‍कम जमा करण्यासाठीची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. कॅशलेस  व्यवहारासंदर्भातील सर्व निर्देशांचे पालन काटेकोरपणे व्हावे, असे  खात्याच्या  विभाग प्रमुखांना आदेश दिल्याचे देसाई यांनी सांगितले.