Mon, Apr 22, 2019 16:25होमपेज › Goa › तिसर्‍या मांडवी पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत होणार

तिसर्‍या मांडवी पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत होणार

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 11:03PMपणजी : प्रतिनिधी

मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचे काम सुमारे 70 टक्के पूर्ण झाले असून हा पूल येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या भव्य पुलाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले असून  त्यांच्या सोयीनुसार, ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान   उद्घाटनाची तारीख निश्‍चित केली जाणार आहे, अशी माहिती  आर्थिक विकास महामंडळाचे  (ईडिसी) अध्यक्ष सिद्धार्थ  कुंकळ्येकर यांनी दिली.
पाटो येथील एका कार्यक्रमास आलेल्या कुंकळ्येकर यांनी अनौपचारिकरित्या पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. कुंकळ्येकर म्हणाले की, मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचे काम सध्या जोरात सुरू असून मधल्या काळात राष्ट्रीय हरित लवादाकडून हस्तक्षेप झाल्याने त्यात काही काळ दिरंगाई झाली.

मात्र, आता लवादाच्या सर्व हरकतींवर समाधानकारक उत्तरे देण्यात आली असून लवादाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुलाचे काम पूर्ण होत आहे. याशिवाय नव्या पुलावरून पणजी शहरात उतरण्यासाठी स्वतंत्र मार्ग करण्याचे ठरल्याने आणखी काही काळ तसेच खर्च जादा घेण्यात आला आहे. मात्र सध्या मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत मांडवी नदीतील खांबांवरील पुलांना केबल घालण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे उर्वरित सर्व कामे लक्षात घेता ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मूळ पुलाचे काम ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाले तरी पावसामुळे पुलावर हॉटमिक्स डांबरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम  उशिरा हाती घ्यावे लागणार आहे. ही दोन्ही कामे  ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाच्या तारखेसाठी दिल्लीला संपर्क साधला जाणार आहे, असे कुंकळ्येकर यांनी सांगितले. 

Tags : Goa, third, mandovi bridge, completed, October