Thu, Feb 21, 2019 09:31होमपेज › Goa › ...अन् मनपाला आली जाग

...अन् मनपाला आली जाग

Published On: Sep 02 2018 1:11AM | Last Updated: Sep 02 2018 1:11AMपणजी : प्रतिनिधी

पणजी शहरातील रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे टीकेचा विषय बनल्यानंतर अखेर  मनपाकडून  काही भागातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले.

सांतिनेझ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर मोठे खड्डे पडल्याने सदर रस्त्याची चाळण बनली होती. या खड्ड्यात विशेषकरून दुचाकी चालकांचा तोल जाऊन ते पडल्याच्याही घटना घडल्या आहेत.
पणजी ही गोव्याची राजधानी असूनदेखील रस्त्यांच्या दुर्दशेवरून   पणजी मनपा तसेच सार्वजनिक बांधकाम खाते टीकेचे लक्ष्य बनले होते. अखेर मनपाकडून काल, शनिवारी काही भागांतील रस्त्यांवर पडण्यात आलेले खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे पाहण्यास मिळाले. मनपा कर्मचारी खड्डे बुजवून त्यावर डांबर टाकताना दिसून येत होते. त्यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मोठ्या पावसात हे रस्ते वाहून जाण्याची चिंताही यावेळी काही  वाहनचालकांकडून व्यक्‍त केली जात होती.

शहरातील 18 जून मार्ग, सांतिनेझ, बसस्थानक आदी महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यांची चाळण बनल्याने वेळावेळी नागरिकांकडून संताप  व्यक्‍त केला जात होता. मात्र, लक्ष वेधूनदेखील त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. अखेर प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर त्वरित रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास मनपाकडून सुरुवात करण्यात आली.