Wed, Jul 17, 2019 18:45होमपेज › Goa › रिवण, कोटार्लीत शाळा इमारतींची अवस्था बिकट

रिवण, कोटार्लीत शाळा इमारतींची अवस्था बिकट

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 10:35PMमडगाव : विशाल नाईक

दक्षिण गोव्यातील प्राथमिक शाळांची अवस्था अतिशय बिकट बनली आहे. रिवण येथील शाळेच्या इमारतीला तडे गेले आहेत. दोन वर्षांत सुमारे पाच वेळा या इमारतीचा स्लॅब कोसळून पडला आहे. दुसर्‍या मजल्यावरील एका वर्गाच्या भिंतीला तडे गेल्याने तो वर्ग बंद करण्यात आलेला आहे.शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यास अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असून मोडकळीकस आलेल्या शाळांच्या दुरुस्तीचे काम अद्याप हाती  घेण्यात आलेले नाही. शाळांची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना वर्गात भिजत अभ्यास करावा लागणार आहे. एकीकडे प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. पट संख्या कमी असल्याने काही शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहेत.

रिवण येथील शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य पायाभूत साधन सुविधा विकास मंडळाकडून या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदार निवडण्यात आला होता. पण अजून काम हाती घेण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांना दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरीत केले जाणार होते. त्यावर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने या वेळी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून वर्गात बसावे लागणार आहे. सांगेतील कोटार्ली शाळेच्या इमारतीचीही दुरवस्था झालेली आहे. दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य संजय देसाई यांनी या शाळेच्या स्थितीबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकून सरकारचे त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या शाळेच्या इमारतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. शौचालयांची अवस्थाही अतिशय वाईट आहे.शौचालये मोडून पडण्याच्या अवस्थेत आहेत. शाळा सुरू होण्यास केवळ दहा दिवस शिल्लक राहिलेले आहेत.सुट्टीच्या कालावधीत या शाळेची दुरुस्ती करणे आवश्यक होते.

याविषयी सांगेचे भागशिक्षणाधिकारी सुरेश लोटलीकर यांना विचारले असता ते म्हणाले की, या शाळेच्या दुरुस्तीसाठी शिक्षण खात्याला सात महिन्यांपूर्वी पत्र पाठविण्यात आले होते. तसेच कोटार्ली शाळेच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरीत करून शाळा इमारतीचे काम हाती घेतले जाणार होते. त्यासाठी दुसरी जागा पाहण्यात येणार होती. परंतु, सध्या शाळांना सुट्टी असल्याने शिक्षकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. लवकरच शिक्षकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांसाठी पर्यायी जागा शोधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती लोटलीकर यांनी दिली. पेरीउदक येथील प्राथमिक शाळेचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केपे तालुक्यात येणार्‍या देवळामळ, मळकर्णे प्राथमिक शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. शाळेला लागून असलेल्या शौचालयाच्या भिंती आणि छप्पर दोन वर्षांपूर्वी कोसळून पडले होते. याविषयी केपेचे भागशिक्षणधिकारी संजय देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्य पायाभूत साधनसुविधा विकास मंडळाने या शाळेच्या दुरुस्तीच्या निविदा काढल्या होत्या. लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. चार जून रोजी शाळा सुरू होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीवेळी विद्यार्थ्यांना दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. मात्र, अजून जागा शोधण्यात आलेली नाही. 

यासंदर्भात  शिक्षण खात्याच्या एका अधिकार्‍याने ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, दक्षिण गोव्यातील शाळांच्या दुरुस्तीचे काम जीएसायडीसी करीत आहे. शाळांच्या दुरुस्ती कामाला उशीर होण्यामागे भागशिक्षणाधिकारी आणि संबंधित शाळेचे शिक्षक जबाबदार आहेत. शाळांना सुट्ट्या पडल्यापासून शिक्षकांचे फोनसुद्धा बंद आहेत. विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय कामाला सुरुवात करणे शक्य नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

चार विद्यार्थ्यांची शाळा

सांगे तालुक्यातील साळजीणी प्राथमिक शाळेत केवळ चार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर दुसरीच्या वर्गात एकही विद्यार्थी नाही. चार विद्यार्थ्यांसाठी चालणारी ही शाळा बंद करून चार विद्यार्थ्यांना सहा किलोमीटरवर असलेल्या वेर्ले येथील शाळेत स्थलांतरीत करण्याचा भागशिक्षणाधिकार्‍यांचा प्रयत्न आहे. परंतु, पालकांचा मात्र यास विरोध आहे. एकाच खोलीत शाळेचे सर्व वर्ग चालतात. भाग शिक्षणाधिकारी लोटलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिलीत आणखी तीन मुले प्रवेश करण्याची शक्यता आहे. सांगेतील सतरकरवाडा येथील शाळेत अवघे सात विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना दुसर्‍या शाळेत पाठविण्यास त्यांचे पालक तयार आहेत, अशी माहिती लोटलीकर यांनी दिली.