Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › किनार्‍यांवरील शॅक्स हटवण्याचे आदेश

किनार्‍यांवरील शॅक्स हटवण्याचे आदेश

Published On: Jun 01 2018 1:58AM | Last Updated: Jun 01 2018 12:23AMपणजी : प्रतिनिधी

गोव्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार्‍या मान्सूनच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटन खात्याने  राज्यातील किनारी भागातील शॅक्स चालकांना आपापली बांधकामे काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. शॅक्सचे तात्पुरते बांधकाम हटवताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी घेण्यासही बजावण्यात आले आहे.पर्यटन खात्याने गुरूवारी काढलेल्या परिपत्रकात शॅक्स चालकांनी किनार्‍यावरील तात्पुरते बांधकाम काढून टाकल्याबद्दलचा अहवाल 10 जूनपर्यंत खात्याकडे सादर करण्यास सांगितले आहे. याशिवाय, सदर बांधकामे पाडताना त्यातील साहित्यांची पर्यावरणाला हानी न पोहचवता कशी विल्हेवाट लावली, याचाही अहवाल 20 जूनपर्यंत देण्यास सांगण्यात आले आहे. 

पर्यटन हंगाम संपल्यानंतर याआधी शॅक्स हटवताना बांधकाम साहित्य किनार्‍यावरच जाळण्यात अथवा वाळूत पुरण्यात आले असल्याचे आढळून आले होते. यामुळे किनारपट्टीचे पर्यावरणदृष्ट्या नुकसान होत असल्याचे पर्यावरणप्रेमी संघटनांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. यामुळे शॅक्स हटवताना असा गैरप्रकार केलेला आढळून आल्यास पुढील 2018-19 सालच्या पर्यटन हंगामात सदर शॅक चालकाला शॅक्स वितरणात भाग घेण्यास संधी दिली जाणार नाही. तसेच, त्याचा परवाना रद्द करून गरज पडल्यास अशा चुकार शॅक्स चालकांवर कायदेशीर कारवाईही करण्याचा गंभीर इशारा खात्याने दिला आहे.