Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Goa › सचिवाच्या गैरहजेरीवरून गदारोळ

सचिवाच्या गैरहजेरीवरून गदारोळ

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 07 2018 11:21PMम्हापसा : प्रतिनिधी

मागील ग्रामसभेचे इतिवृत्त पूर्ण केलेले नसतानाही कळंगुट पंचायत सचिव ग्रामसभेत  गैरहजर राहिल्यामुळे  संतापलेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभा तहकूब करण्याची  जोरदार मागणी केली. सव्वा तास चाललेल्या गोंधळानंतर कोणत्याही कामकाजाविना रविवारी आयोजित ग्रामसभा तहकूब करण्याची नामुष्की पंचायत मंडळावर आली. या विषयीची घोषणा सरपंच अ‍ॅन्थनी मिनेझिस यांनी केली.      

सरपंच मिनेझिस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला सर्व पंचायत सदस्य, प्रभारी सचिव रूई कार्दोज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत सचिव रघुवीर बागकर गैरहजर राहिल्याने त्यांच्या अनुपस्थितीचा प्रश्‍न एकनाथ नागवेकर यांनी उपस्थित केला. पंचायत सचिवांच्या अनुपस्थितीत ग्रामसभा घेण्यास काहीच अर्थ नाही. लोकांच्या प्रश्‍नांचे पंचायत सचिवांनी निरसन करायला हवे. पंचायत सचिवांच्या गैरहजेरीमुळे कारभारात पारदर्शकता नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्याची मागणी करणारा ठरावही नागवेकर यांनी मांडला.      

आपण विदेशी गेलो होतो. आपल्या गैरहजेरीत पंचायत सचिवांनी ग्रामसभेची नोटीस काढली आहे. सचिव कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने रजेवर असून त्यांच्या जागी नव्या पंचायत सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण सरपंच मिनेझिस यांनी दिले. महिन्याच्या पहिल्या रविवारी चर्चची सभा असते. त्यामुळे या दिवशी ग्रामसभा न घेण्याचा ठराव मागील ग्रामसभेत पंचायत मंडळाच्या सहमतीने मंजूर करण्यात आला होता. या ठरावाला बगल देऊन ग्रामसभेची नोटीस काढण्यात आली. शिवाय सदर ठराव ग्रामसभेच्या इतिवृत्तातून कसा व का वगळण्यात आला, असा प्रश्‍न जुझे ब्रागांझा यांनी करून ग्रामसभा तहकुबीच्या ठरावाला पाठिंबा दर्शवला.      

पंचायत राज कायद्यानुसार पंचायतीचे कामकाज चालत नाही. पंचायत सचिव ग्रामसभेतील कामकाजाची नोंदणी करत नाहीत. कामकाजाची नोंदणी न केल्यामुळे पंचायत सचिवांना ग्रामसभेच्या व्हिडिओ चित्रफितीचा आधार घ्यावा लागतो. यासाठी आम्ही त्यांना मदत करतो व करायला तयार आहोत. पण पंचायत सचिवांना हे इतिवृत्त पूर्ण करण्यात कोणताही रस नाही. त्यामुळे मागील ग्रामसभेचे इतिवृत्त लिहून पूर्ण झालेले नाही. त्यापूर्वीच्या ग्रामसभेच्या इतिवृत्तांमध्ये करण्यात आलेल्या अनेक दुरुस्त्या पुन्हा गाळण्यात येतात. यावरून पंचायतीचे प्रशासन पारदर्शक नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पंचायत सचिवांच्या गैरहजेरीत होणारी ही ग्रामसभा पुढे ढकलावी, अशी सूचना करून ग्रामसभा तहकूब करण्याच्या ठरावाला प्रेमानंद दिवकर, संदीप मोरजकर, जुवादोर मासो व इतरांनी पाठिंबा देत ग्रामसभा स्थगितीची मागणी केली. ग्रामसभा तहकूब करण्यास उपसरपंच सुदेश मयेकर व पंचायत सदस्य शॉन मार्टिन्स यांनी हरकत घेतली. त्यांनी वारंवार सरपंचांना ग्रामसभा सुरू करण्याची सूचना केली. सरपंच मिनेझिस, पंचायत मंडळ व काही ग्रामस्थांशी चर्चेनंतर ग्रामसभा तहकूब झाल्याची घोषणा केली. सव्वा तास चाललेल्या या ग्रामसभा तहकुबीच्या नाट्यावर पडदा पडला.      

सरपंचांवर प्रश्‍नांची सरबत्ती

पंचायत सचिव गैरहजर आहेत. ते पुन्हा या पंचायतीत येणार की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रभारी सचिवांसमोर इतिवृत्त पूर्ण करून ग्रामसभेचे कामकाज सुरू ठेवण्याचे आवाहन सरपंच मिनेझिस यांनी ग्रामस्थांना केले. परंतु सचिव का येणार नाहीत, त्यांना सरकारने निलंबित केलेले आहे का, असे प्रश्‍न उपस्थित करून ग्रामसभेचे कामकाज चालू ठेवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला.

पोलिसांना पाचारण

पंचायत मंडळ ग्रामसभा तहकूब करण्यास चालढकल करत असल्याने ग्रामस्थांनी हात वर करून, तसेच उभे राहून ग्रामसभेच्या तहकुबीची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांनी पंचायत मंडळाचा निषेध केला. ग्रामस्थ ग्रामसभा चालवू देत नसल्याने ग्रामसभास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. तरीही ग्रामस्थांनी तहकुबीची मागणी लावून धरली.