Sat, Jul 20, 2019 03:02होमपेज › Goa › ‘फार्मेलिन’वरून सलग दुसर्‍या दिवशी गोंधळ

‘फार्मेलिन’वरून सलग दुसर्‍या दिवशी गोंधळ

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 21 2018 1:34AMपणजी : प्रतिनिधी

फार्मेलिनयुक्‍त मासळीवर  चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष काँग्रेसने पावसाळी अधिवेशनाच्या सलग दुसर्‍या दिवशीही लावून धरल्याने शुक्रवारी विधानसभेत गदारोळ माजला. काँग्रेस आमदारांनी केलेल्या गोंधळामुळे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनवेळा सभागृहाचे कामकाज  तहकूब केले. सभापतींनी दुपारी 2.30 वा. दुसर्‍यांदा सभागृह तहकूब करून सोमवार, दि. 23 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजेपयर्र्ंत कामकाज स्थगित केले. विरोधकांच्या गदारोळात सभागृहातील सलग दुसर्‍या दिवशीही कामकाज होऊ शकले नाही. 

विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे सभागृहाचे कामकाज शुक्रवारी (दि.20) सकाळी 11.30 वाजता सुरू होताच फार्मेलिनयुक्‍त मासळीवर चर्चा करा, अशी मागणी लावून धरल्याने बराच गदारोळ माजला. परिणामी प्रश्‍नोत्तर तास वाया गेला. विरोधकांच्या गोंधळामुळे अवघ्या 15 मिनिटांत सभापती डॉ. सावंत यांना कामकाज दुपारी 2.30 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता कामकाज सुरू होताच पुन्हा एकदा विरोधी  पक्षनेते बाबू कवळेकर यांनी फार्मेलिनवर चर्चेची मागणी लावून धरली. त्याला अन्य विरोधी आमदारांनी पाठिंबा दिल्याने पुन्हा गदारोळ झाला. अखेर सभापती डॉ. सावंत यांनी सभागृहाचे कामकाज  सोमवार, दि. 23 जुलै सकाळी  11.30 वाजेपर्यंत तहकूब केले. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर  म्हणाले, फार्मेलिनयुक्‍त मासळीचा प्रश्‍न हा केवळ विरोधी पक्षाच्या 16 आमदारांशी निगडित नाही तर तो  गोव्यातील सुमारे 15 लाख  नागरिकांशी संबंधित आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाचे आमदार या विषयावर मौन पाळत आहेत.जनतेच्या आरोग्याशी  संबंधित विषयावर चर्चा व्हायलाच पाहिजे. 

फार्मेलिनयुक्‍त मासळीचा विषय महत्वाचा आहे. परंतु सरकारकडून विरोधकांचा आवाज दडपण्यात येत आहे. जनतेच्या आरोग्याशी सरकार खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.सभापती डॉ. सावंत म्हणाले,  फार्मेलिनयुक्‍त मासळी संदर्भात  अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावर विरोधी आमदारांना संधी असूनही ते बोलले नाहीत.  सदर विषयावर  चर्चा करण्यासाठी कामकाज स्थगितीचा प्रस्ताव विरोधकांनी मांडला नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फार्मेलिनप्रश्‍नी विधानसभेत सोमवारी उत्तर देणार असल्याचे सांगूनदेखील विरोधी आमदार  गोंधळ घालत आहेत. गोंधळ घालून  विरोधकांकडून सभागृहाचा  वेळ वाया घालवला जात  आहे. अशा पध्दतीने   सभागृहाचा वेळ वाया घालवू नये. लोकांच्या आरोग्याची काळजी सरकारलादेखील आहे.  प्रश्‍नोत्तर तास वाया घालवू नका. लक्षवेधी सूचनेवेळी फार्मेलिनचा विषय उपस्थित करावा, असे सभापतींनी सांगितल्यानंतरही  विरोधकांनी गोंधळ सुरुच ठेवला.

मासळी माफियांना सरकारचे अभय : फालेरो

सरकारकडून मासळी माफियांना अभय दिले जात असल्याचा आरोप   काँग्रेस आमदार लुईझिन फालेरो यांनी केला. फामेर्र्लिनयुक्‍त मासळी म्हणजे मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. सरकारने परराज्यातून आलेले मासळीचे  ट्रक परत का पाठवले. त्यातील मासळी जप्‍त का  केली नाही, असा प्रश्‍नही त्यांनी  उपस्थित केला.

फार्मेलिनप्रश्‍नी विरोधकांच्या भूमिकेशी सहमत : लोबो

‘मासळीत फार्मेलिन’प्रश्‍नी  विरोधकांनी विधानसभेच्या अधिवेशनात घेतलेल्या भूमिकेशी आपण सहमत असून या विषयावर त्यांना आपण पाठिंबा  देत आहोत, असे उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले. ते म्हणाले, माशांसह भाज्या,फळे आदी अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ वा रसायनांचा वापर ओळखण्यासाठी एफडीएने परिपूर्ण आणि सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे. याप्रश्‍नी मत्स्योद्योग खात्यानेही आपले धोरण बदलून वरचेवर बाजारात तपासणी केली पाहिजे. आम्ही गोमंतकीयांचे आरोग्य सांभाळू शकत नसू, तर गोव्यात पर्यटकांचे आपण काय स्वागत करणार, असा प्रश्‍नही त्यांनी केला.