Sat, Nov 17, 2018 10:04होमपेज › Goa › डिचोली, वाळपईत पावसाच्या तुरळक सरी

डिचोली, वाळपईत पावसाच्या तुरळक सरी

Published On: Mar 15 2018 1:55AM | Last Updated: Mar 15 2018 1:38AMपणजी : प्रतिनिधी

केरळच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यातील डिचोली, वाळपईसह काही भागात पावसाच्या तुरळक सरींनी बुधवारी हजेरी लावली. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात तुरळक पाऊस होण्याचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.  

वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू म्हणाले, पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, तुरळक पावसाचीही शक्यता आहे. डिचोली, वाळपई, सांगे तालुक्यातील काही भागात पावसाची अधिक शक्यता आहे. राज्यातील कमाल तापमान स्थिर असेल, परंतु किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, गेल्या 24 तासांत कमाल तापमान 33.7 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25  अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. गेल्या 24 तासांत उत्तर किंवा दक्षिण गोव्यात कमाल तापमानात फारसा बदल झालेला नाही. राज्यात पणजीत सर्वाधिक 34 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असून, दाबोळी येथे सर्वात कमी 24 अंश सेल्सियस इतके तापमान नोंद आहे. पुढील 48 तास  कमाल तापमान 34 अंश सेल्सियस  तर किमान तापमान 25  अंश सेल्सियस इतक्यावर स्थिर असेल, असेही त्यांनी सांगितले. 

हवामान खात्याचा खबरदारीचा इशारा

राज्यातील किनारी भागात खराब हवामानाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्‍त करण्यात आला आहे. यासाठी  खबरदारीचा उपाय म्हणून क्रूझ, बार्ज, प्रवासी तसेच जलक्रीडा व्यावसायिकांना बोटी नांगरून ठेवण्याचे आदेश बंदर कप्तान खात्याकडून जारी करण्यात आले आहे.