होमपेज › Goa › गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

Published On: Aug 14 2018 1:04AM | Last Updated: Aug 14 2018 12:39AMपणजी : प्रतिनिधी

राज्यभरात  सोमवारी  विविध ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. 14  ऑगस्ट रोजी  मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे. समुद्रात वार्‍याचा  वेग वाढला असून, मच्छीमारांना  पुढील दोन दिवस महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर न जाण्याचा इशारा गोवा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. 

समुद्रातील लाटांची उंचीदेखील 3 ते 4.5 मीटर इतकी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत  मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला होता; परंतु आता पुन्हा मान्सून जोर धरत असून राज्यात मान्सून सक्रिय आहे. राज्यात 15, 16 व 17 ऑगस्ट रोजी सामान्य प्रमाणात पाऊस असेल, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले.

वेधशाळेच्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत  एकूण सरासरी 80  इंच पावसाची नोंद झाली असून गेल्या 24 तासांत राज्यभरात 3 इंच पावसाची नोंद झाली आहे. 

सोमवारी सांगे भागात सर्वाधिक 11 सें.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच मडगाव व केपे भागात प्रत्येकी 9 सें.मी., वाळपई येथे 8 सें.मी., फोंडा व मुरगाव येथे प्रत्येकी  7 सें.मी., साखळी, काणकोण व दाबोळी येथे प्रत्येकी  6 सें.मी. तर म्हापसा येथे 5 सें.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. 

राज्यातील कमाल तापमान 28.3  अंश सेल्सियस तर किमान 24  अंश सेल्सियस इतके आहे. हवामानात 95 टक्के आर्द्रता आहे.