Sat, Nov 17, 2018 03:38होमपेज › Goa › मुसळधार पावसाची आजपासून शक्यता

मुसळधार पावसाची आजपासून शक्यता

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:09AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यात मान्सून काही दिवसांपासून कमजोर झाला असला तरी  रविवारी पेडणे व  जुने गावे  भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, राज्यभरात सोमवार, दि.18 पासून 20 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.पणजीत रविवारी दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून  कोसळत होत्या. त्यामुळे लोकांना रविवारचा दिवस सुट्टीचा असला तरी पावसामुळे घरीच बसून रहावे लागले. दुपारच्यावेळी पाऊस व उन्हाचा लपंडाव सुरू  होता. पावसानंतर लगेच कडक ऊन तर दुसर्‍याच क्षणी जोरदार पावसाच्या सरी यामुळे लोकांची पंचाईत झाली. येत्या आठवड्यात मान्सून पुन्हा जोमाने सक्रिय होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.  

वेधशाळेने दिलेल्या  आकडेवारीनुसार, पेडणे व एला (जुने गावे) येथे प्रत्येकी एका इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. केपे व काणकोण भागात 1 इंच, दाबोळी, मुरगाव व सांगे भागात प्रत्येकी 2 सें.मी. तर पणजी व साखळी येथे 1 सें.मी. इतक्या  पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, समुद्रात मालवण ते वसई  (महाराष्ट्र) या किनारपट्टीवर वेगाने वादळी वारे वाहत असून वादळाची तीव्रता वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे  येत्या 24 तासांत मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.    

तापमानात घट 

गोवा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार तापमानात काही अंशांनी घट झाली आहे. राज्यातील कमाल तापमान 31.2 अंश सेल्सिअस तर किमान 23.5 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. वातावरणात 96 टक्के आर्द्रता आहे. येत्या 24 तासांत कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असेल. येत्या 24 तासांत उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यातील किमान तापमानात अधिक घट होण्याची शक्यता आहे.