Thu, Jun 20, 2019 01:36होमपेज › Goa › राज्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:06AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात रविवारी पणजीसह विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पावसामुळे काही ठिकाणी पडझडीचे प्रकारही घडले. येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील किनारपट्टीच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती  वेधशाळेचे संचालक साहू यांनी दिली. 

साहू म्हणाले की, बंगाल खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून  हवेतील आर्द्रतेमध्ये वाढ होत आहे. पश्‍चिम घाटात वार्‍याचे प्रमाण वाढत असल्याने पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला होता. परंतु आता पुन्हा मान्सून जोर धरत आहे.

वेधशाळेच्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण सरासरी 77 इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत 18 इंचांची तूट आहे. रविवारी सांगे, फोंडा, काणकोण, पणजी, दाबोळी, पेडणे, साखळी व मुरगाव या भागात जोरदार पाऊस होता. राज्यातील कमाल तापमान 27.6  अंश सेल्सियस तर किमान 24  अंश सेल्सियस इतके आहे. हवामानात 96 टक्के आर्द्रता आहे. 

किनारी भागात सावधानतेचा इशारा

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इंफॉर्मेशन सर्व्हिस यांनी किनारी भागात पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सूर्य आणि चंद्र एका रांगेत येणार असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून  पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. समुद्रात 3.0 ते 3.6 मीटर लाटा उसळण्याची शक्यता आहे. वेंगुर्ला ते वास्को किनारी भागासाठी सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.