Sat, Mar 23, 2019 00:12होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर आज परतण्याची शक्यता

मुख्यमंत्री पर्रीकर आज परतण्याची शक्यता

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 12:59AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या नेतृत्व बदल व सत्तांतराच्या चर्चेच्या   पार्श्‍वभूमीवर  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गुरुवारी (6 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता मुंबईत व तिथून सांयकाळी 5 वाजेपर्यंत  राज्यात परतण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ  सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत उपचार घेत असून त्यांच्यावर दोन वैद्यकीय चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. या चाचण्यांचा अहवाल समाधानकारक असल्याने पर्रीकर यांना राज्यात परतण्याची त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी परवानगी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना मुख्यमंत्रिपद देऊन अन्य तीन काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे   सूत्रांनी सांगितले. भाजप आणि घटक पक्षातील मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांना मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले असले तरी पर्रीकर यांची प्रकृती वारंवार ढासळत असल्याने त्यांना पर्यायी व्यवस्था करण्याची भाजप प्रदेश मंडळानेही तयारी केली आहे. कामत याआधी भाजपचे आमदार होते, व त्यांना राज्याचा कारभार हाताळण्याचा अनुभव आहे. यामुळे पर्रीकर जर मुख्यमंत्री नसतील, तर कामत हेच एकमेव मुख्यमंत्री  पदासाठीचे सर्वमान्य उमेदवार असतील,अशी चर्चा घटक पक्षांत आहे.  याविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी भाजप प्रदेश मंडळाने तसेच घटक पक्षांच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर एका सम्मेलनासाठी दिल्लीला तर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे खासगी कामांसाठी मुंबईला गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे राज्यात राजकीय चर्चेला ऊत आला आहे. 

पर्रीकर चतुर्थीला गोव्यात

गणोशोत्सव हा गोव्यात मोठा सण मानला जातो. चतुर्थीच्या काळात पर्रीकर हे दरवर्षी त्यांच्या खोर्ली -म्हापसा येथील निवासस्थानी उपस्थित  असतात. यावेळीही पर्रीकर चतुर्थीवेळी गोव्यात असतील. मात्र, ते पूर्वीसारखे गोमंतकीयांमध्ये जास्त मिसळणार नाहीत. यावेळी प्रथमच ते कुणाच्याही घरी तीर्थप्रसादाला जाणार नसल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.