Mon, May 20, 2019 18:11होमपेज › Goa › नवसो सावंतांची निलंबन स्थगिती याचिका फेटाळली

नवसो सावंतांची निलंबन स्थगिती याचिका फेटाळली

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 07 2018 1:04AMपणजी : प्रतिनिधी

कुर्टी फोंडा येथील गोवा डेअरीचे व्यवस्थापक संचालक नवसो सावंत यांना निलंबित करण्याच्या सहकार निबंधकांच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च  न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने   गुरुवारी फेटाळून लावली.

न्यायालयाने  सहकार निबंधकांनी  ताब्यात घेतलेले गोवा डेअरीचे दस्तऐवज प्रशासकांना सोपवण्याचेही  आदेश दिले. यामुळे प्रशासकांना चौकशी गतीने करण्यास मदत मिळेल, असेही आदेशात नमूद केले.

गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकांना निलंबित करण्याच्या  तसेच संचालकांना अपात्र  ठरवून  गोवा डेअरीवर  प्रशासक नेमण्याच्या सहकार निबंधकांनी  दिलेल्या  आदेशाला  उच्च न्यायालयात व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांच्यासह अन्य चार  संचालकांनी आव्हान दिले होते.

सहकार निबंधकांकडून कायद्याचे उल्लंघन झाले आहे. सहकार निबंधकांनी सुनावणी न घेताच  निलंबनाचा आदेश दिला, असा दावा  नवसो सावंत यांनी आव्हान याचिकेत केला होता. तर अन्य संचालकांनी  दाखल केलेल्या आव्हान याचिकेत अपात्रतेला विरोध करुन सहकार निबंधकांच्या गोवा डेअरीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचीही मागणी केली  होती. 

सरकारच्यावतीने बाजू मांडणार्‍या वकिलांनी सहकार निबंधकांचा प्रशासक नेमण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले होते. गोवा  डेअरीच्या 12 पैकी 8 संचालकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने  गोवा डेअरीवर प्रशासक नेमण्यात आल्याचा दावाही सरकारकडून  करण्यात आला. 

न्यायालयाने मंगळवारी गोवा डेअरीचे  दस्तऐवज  सहकार निबंधकांनी  ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. हे दस्तऐवज आता प्रशासकांना देण्यास  त्यांना  न्यायालयाने सांगितले आहे.