Thu, Apr 25, 2019 21:49होमपेज › Goa › ‘दीनदयाळ’ लाभार्थ्यांना उपचारांसाठी खर्चाचा भुर्दंड?

‘दीनदयाळ’ लाभार्थ्यांना उपचारांसाठी खर्चाचा भुर्दंड?

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 1:26AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील गोमंतकीय रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी उपयुक्‍त असलेली ‘दीनदयाळ स्वास्थ्य विमा’ योजना अंमलात आणण्यासाठी ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी’शी असलेल्या कराराची मुदत  30 एप्रिल रोजी संपुष्टात आली. या विमा कंपनीने ऑगस्टपर्यंत सेवा मुदतवाढीची सरकारची विनंती स्वीकारली नसल्याने आता ‘दीनदयाळ’ योजनेचा लाभ रुग्णांना मिळणार नसल्याने उपचारांसाठी पदरमोड  करावी लागण्याची  शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारी सूत्रानुसार, ‘दीनदयाळ’ योजनेसाठी सेवा मुदत  30 एप्रिल रोजी संपली आहे. ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी’ला आरोग्य खात्याने गेल्या आठवड्यात पत्र पाठवून ऑगस्ट-2018 पर्यंत सेवा मुदतवाढ स्वीकारण्याची  विनंती केली आहे. मात्र, सरकारच्या या विनंतीला अद्याप कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता मे महिन्यापासून वैद्यकीय उपचार घेणार्‍या ‘दीनदयाळ’ लाभार्थी  रुग्णांना औषधे मोफत मिळणार का? याबाबत संभ्रम आहे.

याविषयी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, ही या कंपनीने मुदवाढ स्वीकारली नाही तर ‘दीनदयाळ’च्या लाभार्थ्यांना उपचारांसाठी खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. हा खर्च पुढील शुल्कातून वगळला अथवा सर्व खर्चाचा परतावा दिला जाऊ शकतो. 

‘दीनदयाळ’ ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना  असून सप्टेंबर- 2016पासून ती अंमलात आणली आहे. या योजनेची एक वर्षाची सेवा मुदत संपल्यानंतर आतापर्यंत तीनवेळा योजनेला मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी सध्या अनेक विमा कंपन्यांनी वाढीव दराने बोली लावली असून सरकारतर्फे हे दर कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याने खोळंबा झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.