होमपेज › Goa › सिंधुदुर्गातील रुग्णांना दिलासा

सिंधुदुर्गातील रुग्णांना दिलासा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी :  प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग भागातील रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) उपचारासाठी  ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ सरकारतर्फे राबवली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांना सदर योजनेचे कार्ड वापरून गोमेकॉ इस्पितळात मोफत उपचार घेता येणार आहेत. याची गोमेकॉच्या उत्पन्‍न वाढीसाठीही मदत होणार असून वर्षाला सुमारे 12 कोटी रुपयांचा अतिरिक्‍त महसूल प्राप्त होणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. 

गोमेकॉत उपचारासाठी सिंधुदुर्गवासीयांना शुल्क आकारणी केली जात असल्याच्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंबईत बुधवारी रात्री उशिरा आपली चर्चा झाल्याचे सांगून राणे म्हणाले की, ‘ज्योतिबा फुले जन आरोग्य’ योजनेंतर्गत गोमेकॉत परप्रांतीय विशेषतः सिंधुदुर्गातील  रुग्णांना मोफत सुविधा देण्याबाबत चर्चेत एकमत झाले. यामुळे या योजनेचे कार्डधारक अथवा ओळखीचा पुरावा म्हणून रेशनकार्ड दाखवल्यास, गोमेकॉत या रुग्णांना मोफत उपचार मिळतील. या योजनेचे कार्ड स्वाईप केल्यास उपचारासाठीच्या शुल्काची रक्कम थेट गोमेकॉच्या खात्यात जमा होणार आहे.   महाराष्ट्रातील रुग्णांच्या खर्चाचा भार  महाराष्ट्र सरकारच उचलणार आहे.

यामुळे गोमेकॉचाही महसूल वाढणार आहे. गोमेकॉत येत्या सोमवारपासून या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उघडला जाणार असून त्यात स्वाईप मशीन उपलब्ध केले जाणार आहेत. यामुळे सिंधुदुर्गमधील रुग्णांचा प्रश्न आता सुटला असून कर्नाटक व अन्य राज्यातील सरकारनेही महाराष्ट्राचा कित्ता गिरवण्यास हरकत नाही. 

गोमेकॉ हे सरकारी इस्पितळ असले तरी, पूर्ण कोकणपट्ट्यातच नव्हे तर देशातील अग्रणी आरोग्य संस्था आहे. खासगी इस्पितळांकडेदेखील ज्या सुविधा नाहीत, त्या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. हृदयरोगावरील बायपाससह  सर्व  शस्त्रक्रिया गोमेकॉत केल्या जातात. गोमंतकीयांसाठी या सर्व सेवा व उपचार मोफत दिले जातात. परप्रांतीयांकडून 20 टक्के शुल्क आकारणी जानेवारीपासून सुरू झाली होती. मात्र, गोमेकॉत कुणालाच कधी उपचार नाकारले गेले नाहीत. या वर्षाच्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत गोमेकॉचे उत्पन्न 1.26 कोटी रूपये इतके झाले असून महाराष्ट्रातील आरोग्य योजनेचा समावेश झाल्यास सदर उत्पन्न मासिक 2 कोटी रूपयांपर्यंतही पोचण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ महाराष्ट्राच्या आरोग्य योजनेमुळे वर्षाला 12 कोटींचा महसूल प्राप्त होऊ शकतो, असे राणे यांनी सांगितले. 

बेकायदा स्पा, मसाज पार्लरवर कारवाईसाठी समिती

राज्यातील अनेक स्पा आणि मसाज पार्लरमध्ये ‘क्रॉस मसाज’ होत असून काही ठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसायही सुरू आहे. गोवा हे पर्यटन केंद्र असून  कायदेशीर  मसाज पार्लर व्यवसायास संधी दिला जाणार आहे. मात्र, बेकायदेशीर कृत्ये चालणार्‍या स्पा वा पार्लरवर  कारवाईसाठी  उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी, उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन, आरोग्य संचालक डॉ. संजीव दळवी आणि महिला आयुक्त शुभलक्ष्मी नाईक यांची खास समिती नियुक्त करणार आहे, असे राणे यांनी सांगितले. 

गोमेकॉच्या विकासासाठी सल्लागार 

गोमेकॉचा व्याप  आता  वाढत असून  मागील अनेक वर्षे बेशिस्त आणि अनागोंदी  कारभार सुरू होता. गोमेकॉत अनेक नवीन  सुपरस्पेशालिटी विभागांचा समावेश केला जाणार आहे. गोमेकॉचा शिस्तबद्धरीत्या विकास करण्यासाठी ‘केपीएमजी’ सारख्या मोठ्या सल्लागार कंपनीकडून सल्ला मागितला जाणार आहे. यासाठी तीन सदस्यीय स्वतंत्र समिती नेमून त्यांना सल्लागार कंपनीबाबत अटी व नियम निश्‍चित करण्याचा अधिकार दिला जाणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. 

 

Tags : Panaji, Panaji news, Sindhudurg patients, treatment, Goa Medical College,


  •