होमपेज › Goa › ‘त्या’ रुग्णाला ‘निपाह’चा संसर्ग नाही : डॉ. बेतोडकर

‘त्या’ रुग्णाला ‘निपाह’चा संसर्ग नाही : डॉ. बेतोडकर

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 31 2018 12:10AMपणजी : प्रतिनिधी

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) दाखल झालेल्या निपाहच्या संशयित रुग्णाचा संशय दूर झाला आहे. पुणे येथील प्रयोगशाळेत या रुग्णाबाबतची महत्त्वपूर्ण चाचणी निगेटिव्ह आल्याचे आरोग्य खात्याचे साथ  रोग विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले.   केरळहून रेल्वेमार्गे  येताना थिवी येथून गेल्या सोमवारी म्हापसा येथील आझिलो इस्पितळात आणि नंतर गोमेकॉत संबंधित रुग्णाला दाखल केले होते. या रुग्णाच्या रक्‍ताचे नमुने चाचणीसाठी पुण्याला  पाठविले होते. मंगळवारी रात्री उशिरा या रुग्णाच्या चाचणीचा अहवाल ई- मेलद्वारे आरोग्य खात्याला प्राप्त झाले. हा अहवाल नकारार्थी आला असून, या चाचणीद्वारे रुग्णाचा निपाहविषयक संशय दूर झाला आहे. केरळमध्ये अनेकांचे बळी घेतलेल्या निपाह विषाणूची लागण या रुग्णाला झालेली नाही हे चाचणीअंती स्पष्ट झाल्यामुळे गोमेकॉ इस्पितळाने आणि गोवा प्रशासनानेही सुटकेचा नि:श्‍वास सोडल्याचे सूत्रांनी   सांगितले.  

दरम्यान, आरोग्य खात्याच्या यंत्रणेने गोवा हे पर्यटनदृष्ट्या गजबजलेले राज्य असल्याने खबरदारी घेतलेली आहे. केंद्र सरकारने गोव्याला निपाहबाबत काळजी घेण्यासाठी अंतरिम मार्गदर्शक तत्त्वेही पाठवून दिली आहेत. केरळमधील थंड हवेच्या ठिकाणी गोव्यातील शेकडो लोक अलिकडे सुट्टी घालविण्यासाठी गेले होते. निपाह विषाणूची लागण झाल्याचे कोणते लक्षणे असतात याविषयी गोवा सरकारने माहिती जारी केली होती.  गोवा राज्य निपाह विषाणूच्या संसर्गापासून दूर असल्याचेही स्पष्ट झाल्याने येथील पर्यटन व्यवसायाशीनिगडीत घटकांनीही समाधान व्यक्‍त केले आहे.