होमपेज › Goa › त्रिमंत्री समितीच्या मुदत वाढीचा आदेश आज निघणार 

त्रिमंत्री समितीच्या मुदत वाढीचा आदेश आज निघणार 

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 30 2018 1:29AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारांसाठी अमेरिकेत गेल्यापासून त्यांनी स्थापन केलेल्या त्रिमंत्री सल्लागार समिती (सीएसी)च्या मुदतवाढीचा आदेश आज सोमवारी जारी केला जाणार आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान,50 दिवसात 150 कोटींचे आर्थिक प्रस्ताव त्रिमंत्री सल्लागार समिती व मुख्यमंत्र्यानी मंजूर केले आहेत.याशिवाय समितीच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांनी सुमारे 160 ते  170 कोटी रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी दिली असल्याने एकंदर 320कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.

सार्वजनिक बांधकाम, माहिती व प्रसिद्धी, उच्च शिक्षण, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, वीज, जलस्रोत, क्रीडा, वाहतूक, नगर नियोजन, बंदर कप्तान, सर्वसामान्य प्रशासन या  खात्यांच्या आर्थिक प्रस्तावांवर मुख्यमंत्र्यांनी त्रिमंत्री समितीला हिरवा कंदील दाखवला आहे.

सर्व मंत्र्यांना दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार असल्यामुळे सध्या खात्याअंतर्गत वेगवेगळ्या कामांचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. मुख्यमंत्री अमेरिकेत असल्यामुळे प्रशासन संथगतीने सुरू असले, तरी मंत्र्यांनी  संबंधित खात्यांमधील कामांना गती देऊन वेगवेगळे प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत.

संबंधित खात्यांकडून आर्थिक तरतुदींचे प्रस्ताव सरकारकडे येतात, सर्व प्रशासकीय सोपस्कर झाल्यानंतर फाईल्स त्रिमंत्री समितीचे सदस्य सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई व नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या सहीसाठी जातात.

मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येत असल्यामुळे बाय सर्क्युलेशन पद्धतीने फाईल या तिन्ही मंत्र्यांकडे पाठवून प्रस्तावांना मंजुरी घेतली जाते. विशेष म्हणजे, आजवर एकही प्रस्ताव समितीने फेटाळलेला नाही. समितीने सुमारे  प्रस्ताव मंजूर केले आहेत. समितीने आपल्या अधिकाराबाहेरील मोठ्या रकमेच्या प्रस्तावांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर मुख्यमंत्री असे प्रस्ताव मंजूर करतात. आतापर्यंत सुमारे 170 कोटी रुपये खर्चाच्या कामांचे 15 प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहेत.