Fri, Aug 23, 2019 14:27होमपेज › Goa › कोलवा सर्कलला देणार ‘जनमत कौल सर्कल’ नाव

कोलवा सर्कलला देणार ‘जनमत कौल सर्कल’ नाव

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:17AM

बुकमार्क करा
माडगाव : प्रतिनिधी

मडगावातील कोलवा सर्कल आणि पांडव कॅपेल सर्कलचे नाव आता बदलणार आहे. जनमत कौलाच्या दिनाचे औचित्य साधून कोलवा सर्कलला जनमत कौल सर्कल तर पांडव कॅपेलला कै. चंद्रकांत केणी यांचे नाव दिले जाणार आहे. मडगाव नगरपालिकेच्या बैठकीत हा ठराव सर्वांच्या सहमतीने संमत करण्यात आला.

नगराध्यक्ष बबिता आंगले यांनी हा ठराव गुरुवारच्या पालिका मंडळाच्या बैठकीत मंडला असता सर्वांच्या संमतीने त्यास सहमती देण्यात आली. उपनगराध्यक्ष टिटो कार्दोस आणि मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस उपास्थित होते.

मंगळवार दि.16 जानेवारी रोजी राज्यभर जनमत कौलाचा दिवस साजरा केला जाणार आहे. जनमत कौलाचे जनक म्हणून डॉ. जॅक सिक्वेरा यांना ओळखले जाते. सोळा जानेवारी रोजी मडगावात जनमत कौलाचा सोहळा विविध कार्यक्रमांनिशी साजरा केला जाणार आहे, याच दिवशी कदंबा बस स्थानकाजवळ असलेल्या कोलवा सर्कलचे जनमत कौल सर्कल असे नामकरण होणार आहे. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांनी त्यास मंजुरी दिल्याने नामकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जनमत कौलाचे जनक डॉ. जॅक सिक्वेरा, पुरुषोत्तम काकोडकर, रवींद्र केळेकर, चंद्रकांत केणी, उल्हास बुयांव, शाबू देसाई, एमियो पिमेंट, डॉ. लुईस प्रोतो बार्बोसा, शंकर भंडारी, श्रीपाद घारसे, व्हिक्टोरिया फर्नांडिस, निर्मला सावंत, वासुदेव शर्मळकर, विजयभाई शर्मळकर, उदय भेंबरे, इरासमो दे सिक्वेरा, वासुदेव साळगावकर, उर्मिदां लाइतावं,डॉ.अल्वारो फुर्तादो,डॉ. विनायक मयेकर, लक्ष्मणराव सरदेसाई, सी. पी. डीकॉष्टस, सुहासिनी तेंडुलकर, टीओटीनो परेरा, जनार्धन फळदेसाई, कार्मो रॉड्रीगीस, अनंत नरसिंह नाईक,  नरसिंह दामोदर नाईक, एम बोयेर, बाबूराव केरकर, शांताराम म्हाब्रे, डॉ. सॅबस्तीयो माजारेलो, जोआव डिसोझा, ओरलँड लोबो, जॉकीम अरौजो, डॉ. मौरिलिओ फुर्तादो या सर्वाचे पोर्ट्रेट कोलवा सर्कल ते रवींद्र भवन या रस्त्यावर लावले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा बबिता आंगले यांनी सांगितले. 

हा सर्व खर्च राज्य सरकार करीत असले तरी निम्मा खर्च मडगाव पालिका उचलणार आहे, असे आंगले यांनी सांगितले. मडगावातील प्रसिद्ध पांडव कॅपेल जंक्शनला ज्येष्ठ पत्रकार कै. चंद्रकांत केणी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असता, त्यासही नगरसेवकांनी सर्वमताने मंजुरी देण्यात आली. खारेबांद येथे 15000 चौ.मी. जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आला. त्या जाग्यावर पार्किंग प्रकल्प किंवा अन्य कोणताही लोकोपयोगी प्रकल्प उभारता येतो, असे नगराध्यक्षा आंगले यांनी स्पष्ट केले.