होमपेज › Goa › लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन

लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 10:27PMमडगाव : प्रतिनिधी 

गोवा राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यागत स्थिती उद्भवल्याने काँग्रेस पदाधिकारी सार्वजनिक वाहनांद्वारे प्रवास करून ‘जन गण मन ’ उपक्रमांतर्गत जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत.  जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी आंदोलन करावे लागले तरीही मागे हटणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी  सांगितले.  मडगावात आयोजित  जनगण मन कार्यक्रमात ते बोलत होते नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा, काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो,  अविनाश तावारिस, नगरसेवक अविनाश शिरोडकर, जना भंडारी व इतर कार्यकर्ते   उपस्थित होते.

चोडणकर म्हणाले,की गोव्यात सरकार  असून नसल्यासारखी  स्थिती असल्याने जनता वैफल्यग्रस्त बनली आहे. विकासकामे रखडल्याने संताप व्यक्त होत आहे. अनेक लोकांनी काँग्रेसकडे आपल्या समस्या मांडल्या. काही समस्यांचे आम्ही निवारणही केले. जनतेत मिसळून त्यांच्या समस्या  जाणून  घेत असल्याने लोक स्वतःहून आपल्या समस्या मांडत आहेत. लोकांनी जीएसटी, पाणी, वीज, बेरोजगारी, खाणबंदी आदी अनेक विषयांसंदर्भात समस्या मांडल्या आहेत.  एकूणच पक्षाच्या जनगणमन कार्यक्रमाला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे ते म्हणाले.  डिसा म्हणाले,की  राज्यात 24 तास वीज मिळण्याऐवजी दिवसातून 24  वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. सरकार लोकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याचेही ते म्हणाले. लोकांचे प्रश्‍न यापूढे विधानसभेत मांडले जाणार असून गरज पडल्यास संबंधित मंत्र्यांशीही आम्ही चर्चा  करू,असे त्यांनी सांगितले.