होमपेज › Goa › पोलिसांकडून मानसिक दबावाचा प्रयत्न

पोलिसांकडून मानसिक दबावाचा प्रयत्न

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 10 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

सरकारविरोधात आवाज उठवत असल्यानेच सरकारकडून आपल्यावर पोलिस खात्यामार्फत   मानसिक  दबाव  टाकला जात आहे, अशी टीका  महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

कुतिन्हो म्हणाल्या की, नेत्रावळी सांगे येथील विनयभंग झालेल्या अल्पवयीन मुलीची ओळख सार्वजनिक केल्याचा खोटा आरोप करून पोलिस खात्याकडून सुमारे 15 फोन करून आपल्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मागील एक वर्षापासून महिलांना भेडसावणार्‍या विविध समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या धोरणांविरोधात आपण व महिला काँग्रेसच्या अन्य सदस्य आवाज उठवत आहोत. कायमस्वरूपी नोकरीसाठी लढा देणार्‍या पॅरा शिक्षकांना  पाठिंबा दिल्याने जवळपास सात महिन्यांनंतर सरकारने आपल्या विरोधात एफआयआर नोंदवला.

नेत्रावळी सांगे येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा झारखंड येथील एका युवकाने विनयभंग केला. या घटनेनंतर पीडित व तिच्या कुटुंबीयांची आपण व महिला काँग्रेसच्या अन्य सदस्यांनी तिच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आपण पीडितेची ओळख सार्वजनिक केल्याचा भाजपकडून खोटा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर सोमवारी  सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान गुन्हा अन्वेषण विभाग व वेगवेगळ्या पोलिस स्थानकांतून   आपल्याला 15 फोन करण्यात आले.  पीडितेची ओळख जाहीर का केली, असे  प्रश्‍न करण्यात आले.  सदर प्रकार हा आपली सतावणूक असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.