होमपेज › Goa › मासळी बाजारचे गेट सकाळी दहापर्यंत रापणकारांसाठी खुले

मासळी बाजारचे गेट सकाळी दहापर्यंत रापणकारांसाठी खुले

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 8:37PM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनिधी

पारंपरिक रापणकारांसाठी मडगाव घाऊक मासळी बाजारचे गेट सकाळी दहा वाजेपर्यंत खुले राहणार असून याठिकाणी किरकोळ मासळी विक्रेते  तसेच फळ व भाजी विक्रेत्यांवरही बदी घालण्यात येईल. घाऊक मासळी विक्रेत्यांसाठी 10 वा.पर्यंत मार्केटचे गेट खुले राहणार असले तरी किरकोळ विक्रेत्यांना येथे व्यवसाय करता येणार नाही, असे नगरविकास मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. घाऊक मासळी बाजारातील समस्येवर तोडग्यासाठी बुधवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला मासळी निर्यातदारांचे नेते एम. एम. इब्राहिम, बाणावलीचे आमदार  चर्चिल आलेमाव, रापणकारांचे नेते जॉन फर्नांडिस, मडगाव नगराध्यक्षा बबिता प्रभुदेसाई, एसजीपीडीएचे सदस्य सचिव अशोककुमार व इतर उपस्थित होते. घाऊक बाजारात जी मासळी विक्रीसाठी आणली जायची ती विकली न जाता राहिली तर रापणकार याच मार्केटमध्ये किरकोळ पद्धतीने विकत असत. ही विक्री बंद करावी, अशी मागणी मासळी विक्रेत्यांनी केल्याने ही बैठक बोलाविण्यात आली होती. 

सरदेसाई पुढे म्हणाले की, रापणकारांच्या मासळीची विक्री न झाल्यास त्यांना एसजीपीडीए किरकोळ मासळी बाजारात ती विकण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी त्यांना विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली जाईल. शिवाय त्या विक्रेत्यांना ओळखपत्रे देण्यात येतील.घाऊक मासळी विक्रेत्यांठी लवकरच नवीन मार्केट उभारण्यात येईल. 

मंत्री  सरदेसाई यांनी 3 ऑक्टोबर 2017 रोजी घाऊक मासळी बाजाराची  पाहणी केली होती. त्यावेळी काही किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्या मांडल्या होत्या. घाऊक मासळी बाजारात केवळ घाऊक व्यापारच होईल, किरकोळ व्यापाराला येथे सूट दिली जाणार नाही, असे त्यावेळी सरदेसाईंनी किरकोळ मासळी विक्रेत्यांना सांगितले होते. त्याशिवाय एसजीपीडीएतील किरकोळ मासळी बाजाराला देशातील ‘सर्वोत्कृष्ट फिश मार्केट’  बनविण्याचा मानस असून त्याठिकाणी सर्व आवश्यक साधनसुविधा पुरवू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.