होमपेज › Goa › आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा डेहराडूनला

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा डेहराडूनला

Published On: Jun 01 2018 1:58AM | Last Updated: Jun 01 2018 12:18AMपणजी : प्रतिनिधी                      

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे 21 जून रोजी साजरा  होणार आहे. मंत्रालयाने योग दिन साजरा करण्यासाठी विशिष्ट उपक्रम राबविण्याकरिता देशभर संघटित प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पणजी, मडगाव, म्हापसा, फोंडा व सावर्डे येथे योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्रालये व त्यांचे विभाग, राज्य सरकार, ग्राम प्रधान (सुमारे 2.5 लाख गावे), योग संस्था, शैक्षणिक संस्था, चेंबर्स ऑफ कॉमर्स या सर्वांना सदर उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली असून काही उपक्रम सुचविण्यात आले आहेत. या संस्था संबंधित उपक्रम राबवतील, अशीही माहिती यावेळी नाईक यांनी दिली.या वर्षीपासून दोन श्रेण्यांमध्ये प्रत्येकी दोन पंतप्रधान योग पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये योग क्षेत्राचा विकास व प्रचार-प्रसारामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान दिलेल्यांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे नाईक यांनी यावेळी सांगितले. 

यानिमित्ताने सर्व जिल्ह्यांमध्ये योग प्रशिक्षण कार्यक्रम, 50 योग उद्याने उभारण्यात आली आहेत. याशिवाय पुढील वर्षभरात आणखी 150 उद्याने उभारण्यात येणार आहेत. तसेच राज्यस्तरीय योग मआखणी करण्यात आली आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली. या व्यतिरिक्त महत्वाचे म्हणजे आयुष मंत्रालय  स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने   चाळीस वर्षे वयाहून अधिक वयाच्या महिलांसाठी योग नियमावली विकसित करत आहे. ही नियमावली आंतरराष्ट्रीय योग दिनी प्रकाशित करण्यात येईल. आयुष मंत्रालय 21 जून रोजी यावर विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार आहे.  गोवा राज्यातदेखील 21 जून रोजी राज्य प्रशासन मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग या सोहळ्यासाठी उपस्थित असतील, अशी आशा पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.