Wed, Mar 27, 2019 02:13होमपेज › Goa › शववाहिका न दिल्याने मृतदेह कारमधून नेण्याचा प्रसंग

शववाहिका न दिल्याने मृतदेह कारमधून नेण्याचा प्रसंग

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 1:40AMमडगाव ः प्रतिनिधी 

रुग्णवाहिका इतर रुग्णांसाठी थांबवून ठेवण्याच्या कृतीमुळे नऊ वर्षीय पेवल परेरा या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यावर त्यासंबंधी कोणतीच जबाबदारी हॉस्पिसियोच्या प्रशासनाने घेतली नाही. उलट पेवल हिचा मृतदेह नेण्यासाठी हॉस्पिसियोने परेरा कुटुंबीयांना शववाहिका न दिल्याने अखेर त्यांना मारुती स्विफ्ट कारमधून तिचा मृतदेह न्यावा लागला. 

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या भेटीनंतर काही दिवस सुरळीत चाललेले हॉस्पिसियो इस्पितळ पुन्हा पूर्वपदावर आल्याची चर्चा या प्रकारामुळे इस्पितळ परिसरात होत होती.

या घटनेबद्दल उपस्थित लोकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. पेवल हिचे निधन झाल्यानंतर सुमारे अडीच तास तिचा मृतदेह तसाच बाहेर ठेवण्यात आला. मृत्यूचा दाखला देण्यासाठी तब्बल दोन तास लावले. दरम्यान, पेवलच्या आई-वडिलांनी आणि इतर नातेवाईकांनी हॉस्पिसियोतच तिच्या मृतदेहाजवळ प्रार्थना केली. अडीच तासानंतर तिच्या मृत्यूचा दाखला तयार झाला. तोपर्यंत सायंकाळचे साडेचार वाजले होते. दरम्यान, या घटनेची दखल घेऊन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे हॉस्पिसियोकडे यायला निघाले आहेत,अशी माहिती पसरली होती.त्यामुळे कर्मचार्‍यांनी पेवलच्या निधनामुळे निर्माण झालेल्या वादाकडे दुर्लक्ष करून हॉस्पिसियोच्या साफसफाईचे काम सुरू केले.पण आरोग्यमंत्री आलेच नाहीत.

पेवल हीचा मृतदेह घरी नेण्यासाठी सायंकाळी बाहेर काढण्यात आला पण हॉस्पिसियोने त्यांना शववाहिका उपलब्ध  करून दिली नाही.शेवटी परेरा कुटुंबाने खासगी मारुती स्विफ्ट गाडी आणून त्यात तिचा मृतदेह घातला व घेऊन गेले.या प्रकाराची आरोग्यमंत्र्यांनी दखल घ्यावी ,अशी मागणी माजी नगरसेवक जॉनी क्रास्टो यांनी केली आहे.