Tue, Jul 23, 2019 06:24होमपेज › Goa › ‘गोवा स्टार्ट अप’ संकेतस्थळाचे शनिवारी उद्घाटन 

‘गोवा स्टार्ट अप’ संकेतस्थळाचे शनिवारी उद्घाटन 

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 27 2018 12:40AMपणजी : प्रतिनिधी

देशातील ‘स्टार्टअप उद्योगांचे केंद्र’ बनण्याची गोव्याची क्षमता असून राज्याचे ‘गोवा स्टार्टअप धोरण’ आणि संकेतस्थळाचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शनिवारी पणजीत होणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे  यांनी सांगितले.

पर्वरी येथील सचिवालय सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खंवटे म्हणाले की, राज्याचे ‘आयटी धोरण’ याआधी जाहीर झाले असले तरी देशातील अनेक नवउद्योजकांना आकर्षित करणारे ‘स्टार्ट अप धोरण’ अंमलात आणले गेले नव्हते. यासाठी आयटी खात्यातर्फे येत्या शुक्रवार व शनिवार असे दोन दिवसाचे स्टार्ट अप परिषद राज्यात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला आतापर्यंत देशातील व राज्यातील मिळून सुमारे 250 स्टार्ट अप उद्योजकांनी प्रतिसाद दिला असून आणखीही नव उद्योजक परिषदेला नोंदणी करणार आहेत.  परिषदेच्या पहिल्या दिवशी दोनापावला येथील सिदादे गोवा हॉटेलात स्टार्ट अप धोरणाबाबत अनेक नामवंतांच्या उपस्थितीत चर्चासत्र होणार आहे. परिषदेच्या दुसर्‍या दिवशी, शनिवारी पणजीतील गोवा मनोरंजन सोसायटीच्या सभागृहात सकाळी 10 वाजता  केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ‘गोवा स्टार्ट अप धोरण’ आणि संकेतस्थळाचे उद्घाटन होणार आहे. देशातील स्टार्ट अप उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असलेल्या उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक साधन सुविधा, सोयी, ई- गव्हर्नन्स, ब्रॉडबँड सेवा, सरकारचे सहाय्य आदींची गरज आहे. या सेवा निर्माण करण्यासाठी सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या आयटी सल्लागार समितीद्वारे सूचना व शिफारशी विचारात घेतल्या जाणार असल्याचेही खंवटे यांनी सांगितले. 

या पत्रकार परिषदेत आयटी सल्लागार समितीचे सदस्य मोहनदास पै, श्रीनिवास धेंपो, ‘ईडीसी’चे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर, संतोष केंकरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Tags : goa, goa start up, panaji