Wed, Jul 17, 2019 20:42होमपेज › Goa › ‘ड्रग्ज’ला सरकारने त्वरित आळा घालावा

‘ड्रग्ज’ला सरकारने त्वरित आळा घालावा

Published On: Feb 22 2018 1:39AM | Last Updated: Feb 22 2018 1:39AMपणजी : प्रतिनिधी

अंमली पदार्थ व्यवहाराला आळा घालण्याबाबत पोलिस गंभीर  नाहीत. ड्रग्ज अगदी शिक्षण संस्थांपर्यंत पोहचले  असून  राज्यातून अंमली पदार्थाचा उपद्रव समूळ नष्ट करण्यासाठी   सरकारने कडक  धोरण राबवून  ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी करून ड्रग्जबाबत  सरकारच्या भूमिकेबाबत विरोधी आमदारांनी बुधवारी सभागृहात   प्रश्‍नोत्तर तासावेळी आक्रमक भूमिका  घेतली.

सभागृहाचे नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर  म्हणाले की, गोव्यात  ड्रग्ज माफीया नाहीत. मात्र,   किनारी  राज्य असलेल्या गोव्यात ड्रग्ज हा विषय गंभीर आहे.  पोलिसांनी शिक्षण संस्थांना पत्र पाठवून यासंबंधी शिक्षण संस्था परिसरात ड्रग्ज प्रकरणे आढळल्यास त्याची त्वरित माहिती  द्यावी, असे कळविले आहे. मात्र, आतापर्यंत एकाही महाविद्यालयाने  या पत्राला  उत्तर दिलेले नाही. 

ड्रग्जविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई  केली जात आहे. विरोधकांचा पाठिंबा मिळाला तर ड्रग्ज व्यवहारांचे राज्यातून समूळ उच्चाटन करू. अशा गोष्टींमुळे पिढी संपते.त्यामुळे ड्रग्जसारख्या समस्येवर एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. या विषयाचे राजकारण करु नये. ड्रग्ज व्यवहारांमध्ये आढळणार्‍या   विदेशी नागरिकांना  त्यांच्या देशात परत पाठविण्याचे आश्‍वासन  ढवळीकर  यांनी दिले. 

आ. क्‍लाफासिओ  डायस, दिगंबर कामत, आंतोनियो फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा व इजिदोर फर्नांडिस  यांनी राज्यातील  अमलीपदार्थ समस्येबाबत प्रश्‍न विचारला होता.विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर म्हणाले, ड्रग्ज  ही  राज्याला भेडसावणारी गंभीर समस्या आहे. मुख्यमंत्र्यांनी  ड्रग्जची समस्या शिक्षण संस्थांपर्यंत पोहचली असून नवनव्या प्रकारचे ड्रग्ज  बाजारात उपलब्ध होत असल्याचे विधान केले होते.  काही विदेशी नागरिक विद्यार्थी व्हीसावर गोव्यात येतात व  ड्रग्ज व्यवसायात गुंततात. त्यांना त्यांच्या देशात पुन्हा पाठविण्याची कारवाई करावी.

आ. चर्चिल आलेमाव म्हणाले, विद्यार्थ्यांपर्यंत  ड्रग्ज पोहोचत असून ही चिंतेची बाब आहे. या समस्येवर उपाय  म्हणून   राज्यातील सर्व  महाविद्यालय परिसरात  देखरेखीसाठी  वेगळा  ड्रग्ज नियंत्रण कक्ष स्थापन करावा. 

विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत पोलिसांना पत्रे

बांबोळी येथील कुजिरा शिक्षण संकुलातील प्राध्यापकांनी  आपले काही विद्यार्थी वर्गात वेगळ्याच प्रकारे वागतात. त्यांना काही विचारल्यास ते काहीच सांगत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यावे, अशी तीन पत्रे पोलिसांना पाठविली आहेत.  मात्र, पोलिसांकडून  या पत्रांना अजूनही  प्रतिसाद मिळालेला नसल्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी  निदर्शनास आणले.

अंमलीपदार्थ व्यवहारप्रकरणी या वर्षात 23 प्रकरणे

2018 या  चालू वर्षात पोलिसांनी अंमलीपदार्थ  प्रकरणी 23 प्रकरणांची नोंद करुन 27 जणांना अटक केली तर 52 लाख रुपयांचा अमलीपदार्थ जप्‍त केला.2015 साली अमलीपदार्थ प्रकरणी 61 प्रकरणे नोंद करुन  71 जणांना अटक  करुन 10 कोटी 59 लाख रुपयांचा अमलीपदार्थ जप्‍त केला. 2016 साली 60 प्रकरणे नोंद करुन 69 जणांना अटक केली तर 2017 साली 168 प्रकरणे नोंद करून  190 जणांना अटक केली, अशी माहिती  सभागृह नेते तथा मंत्री  सुदिन ढवळीकर यांनी  दिली.