Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Goa › सरकारकडून ‘टाईम आऊट’कडे हिशोबाची मागणी

सरकारकडून ‘टाईम आऊट’कडे हिशोबाची मागणी

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 8:41PM

बुकमार्क करा
पणजी :  प्रतिनिधी

वाणिज्य कर खात्याने  वागातोर येथे 27 ते 29 डिसेंबर-2017 या कालावधीत झालेल्या ‘टाइम आउट 72’ इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक  (इडीएम)  महोत्सवात झालेल्या उलाढालीबाबत विचारणा केली आहे. सदर तपशील देण्यासाठी आयोजकांनी आठवड्याची मुदत मागितली आहे. 

‘टाइम आउट’ फेस्टिव्हलचे आयोजक ‘सुदर्शन एंटरटेन्मेंट कंपनी’ ला वाणिज्य कर खात्याने पत्र पाठवून उलाढालीबाबत विचारणा केली आहे. या तीन दिवसांच्या काळात समारे 55 हजारांवर लोकांनी या डान्स पार्टीत भाग घेतल्याचा एक अंदाज आहे. कोणत्या दराची किती तिकिटे विकली गेली याचा तपशील खात्याच्या अधिकार्‍यांनी मागितला आहे.

या इडीएमच्या कालावधीत खात्याचे अधिकारीही प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून नजर ठेवून होते.  तुलनेत पहिल्या दिवशी गर्दी कमी होती, परंतु नंतरचे दोन्ही दिवस गर्दी वाढली. खात्याच्या अधिकार्‍यांनी काढलेल्या अंदाजानुसार पहिल्या दिवशी 8 हजार, दुसर्‍या दिवशी 15 हजार तर तिसर्‍या दिवशी 32 हजार लोकांनी या डान्स पार्टीत भाग घेतला असल्याची अंदाजे आकडेवारी मिळाली आहे.

‘टाइम आउट’ फेस्टिव्हलमध्ये प्रत्यक्षात किती उलाढाल झाली याचा नेमका आकडा उपलब्ध झालेला नाही. 1,999 रुपयांपासून 14,999 रुपयांपर्यत ऑनलाइनव्दारे तिकीटे विकली गेलेली आहेत. अन्नपदार्थ व मद्याची सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. पहिल्या दिवशी 17 लाख, दुसर्‍या दिवशी 23 लाख तर तिसर्‍या दिवशी 70 लाख रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. कंपनीने अधिकृतपणे उलाढाल जाहीर केल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. या डान्स पार्टीतून मिळणारा ‘जीएसटी’ करांमध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारचा प्रत्येकी अर्धा वाटा असेल.