Tue, Mar 26, 2019 21:52होमपेज › Goa › राज्यातील मासळी बाजार ठप्प

राज्यातील मासळी बाजार ठप्प

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 12:27AMमडगाव : प्रतिनिधी

अन्न आणि औषध प्रशासनाने गुरुवारी पहाटे मडगावच्या घाऊक मासळी बाजारात टाकलेल्या छाप्यानंतर वितरकांनी घाऊक मासळी बाजार बंद ठेवल्याने परराज्यातून आलेली सतरा ट्रक मासळी राज्यातील इतर भागात पोहोचू शकली नाही. शिवाय, स्थानिक मासळीदेखील मार्केटबाहेर जाऊ न शकल्याने मडगावसह पणजी, म्हापसा व अन्य शहरांतील मासळी बाजार गुरुवारी बंद राहिले. मासळी बाजार बंद राहिल्याने मासळी व्यावसायिकांना सुमारे एक कोटी रुपयांचा फटका बसला. छाप्यामुळे बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिल्याने गोमंतकीयांच्या ताटात गुरुवारी मासळी पोहोचू शकली नाही.

मडगावच्या घाऊक मासळी बाजारात ‘फार्मोलीन’ सारख्या घातक रसायनांचा वापर होत असल्याच्या संशयावरून गुरुवारी पहाटे अन्न आणि औषध प्रशासनाच्या दक्षिण गोवा अधिकारी एव्हा फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली माडेल येथील घाऊक मासळी बाजारावर छापा टाकण्यात आला. यावेळी नेहमीप्रमाणे गोव्याबाहेरून मासळी घेऊन आलेले सुमारे सतरा ट्रक घाऊक मासळी बाजारात दाखल झाले होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी आपल्यासोबत फिरती प्रयोगशाळा (लॅबोरेटरी व्हॅन) आणली होती. सर्व ट्रक कंटेनर्समधील मासळीचे नमुने घेऊन त्यांची त्याच ठिकाणी चाचणी करण्यात आली. चाचणीचा प्राथमिक अहवाल सकारात्मक आल्याने दुसरा अहवाल येईपर्यंत मासळीचे ट्रक येथून हलवू नयेत, अशा सूचना मासळी विक्रेते आणि वितरकांना देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या परराज्यातील मासळीबरोबर घाऊक मासळी बाजारात कुठ्ठाळी येथून ‘बुराटे’ आणि ‘तिसर्‍या’सुद्धा आल्या होत्या. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी या मासळीचे नमुने घेतले असता त्यातही ‘फार्मोलिन’चा अंश  आढळून आल्याने ही मासळीदेखील अडवून ठेवण्यात आली. अधिकार्‍यांनी कडक भूमिका घेतल्याने घाऊक मासळी बाजारातून मासळी बाहेर जाऊ शकली नाही.

सध्या मासेमारी बंद असल्याने केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, महाराष्ट्र आदी राज्यांतून गोव्याला मासळी पुरवठा होतो. पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत घाऊक मासळी बाजारात मासळीचा लिलाव केला जातो.स्थानिक मासळी विक्रेतेसुद्धा घाऊक मासळी बाजारातून मासळी खरेदी करतात. पहाटेच ही कारवाई झाल्याने मासळीचा लिलाव होऊ शकला नाही.त्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या आदेशामुळे मासळीचे ट्रक बाहेर पडू शकले नाहीत. घाऊक मासळी संघटनेचे अध्यक्ष मौलाना  इब्राहिम यांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असून मासळी तशीच ट्रकांमध्ये  भरलेली असल्याने उद्या, शुक्रवारपर्यंत मासळीचा दर्जा आणखी खालावणार आहे. मासळी खराब होण्याची भीती असल्याने नुकसानीचा आकडा एक कोटीहून जास्त होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

पंधरा दिवसांपूर्वी चेन्नई येथे अशाच प्रकारे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला होता.सुरुवातीला सकारात्मक अहवाल आला होता पण नंतर काहीच निष्पन्न झाले नाही, अशी माहिती इब्राहिम यांनी दिली. मासळीच्या पाण्याचे नमुने अधिकार्‍यांनी घेतले होते. त्यावेळी आम्ही त्यांना मासळीच्या आतील भागाचे नमुने घ्यावेत, असे सुचविले होते पण अधिकार्‍यांनी ते ऐकले नाही. या कारवाईला आम्ही पूर्ण सहकार्य केले आहे, असे इब्राहिम म्हणाले.इब्राहिम यांनी दिलेल्या माहितीनुसार दर दिवशी सुमारे पन्नास लाख ते एक कोटी रुपयांची उलाढाल या बाजारात होत असते. उद्या शिळ्या मासळीच्या किमती आणखी खाली उतरणार आहेत, असे ते म्हणाले.

पोलिस तैनात

घाऊक मासळी बाजारात अचानक पडलेल्या छाप्यामुळे  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण मौलाना इब्राहिम यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वाटल्याने  पोलिस तैनात करण्यात आले होते, अशी माहिती फातोर्डा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली.

पणजीत मासळीप्रेमींवर रिक्त हस्ते परतण्याची वेळ 

पणजीतील मासळी मार्केटात गुरुवारी, मडगावच्या घाऊक मासळी बाजारातून पुरवठा न झाल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. पणजीतील मासळी मार्केटमध्ये दररोज पहाटेपासून असणारी वर्दळ गुरुवारी आढळून आली नाही. गोड्या पाण्यातील, मानशीची अथवा लहान होड्यांतून मिळवलेली थोडीफार मासळी सकाळच्यावेळी हातोहात खपली. अनेक विक्रेत्यांकडे आदल्या दिवसाची थोडी मासळी शिळी आणि बर्फातील मासळी होती, तीही चढ्या दराने विकण्यात आली. मात्र, मडगावात मासळी विक्रेत्यांवर छापा पडल्याचे समजताच पणजीतील मासळी विक्रेत्यांनी पुढील विक्री बंद केली. यामुळे सकाळी मासळीसाठी आलेल्या ग्राहकांना निराशेने परत जावे लागले.

‘गोमंतकीयांनी घाबरू नये’

घाऊक मासळी बाजार बंद ठेवून सर्व वितरक आणि विक्रेत्यांनी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सरदेसाई यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी याबाबत चर्चा केली असल्याचे सांगितले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी जेनमुने घेतले होते त्याचा अहवाल नकारात्मक आलेला आहे, त्यामुळे गोमंतकीयांनी काळजी करण्याची गरज नाही, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

अधिकार्‍यांशी वाद

कुठ्ठाळीतून मडगाव मासळी बाजारात आलेल्या स्थानिक मासळीतदेखील फार्मोलिन आढळून आल्याचे सांगितले गेल्याने स्थानिक मासळी विक्रेत्यांमध्ये वादाला तोंड फुटले.  कुठ्ठाळी येथून बुराटे माशाबरोबर तिसर्‍यादेखील आल्या होत्या. या मासळीमध्ये कोणतेच रसायन असू शकत नाही, असा दावा करून विक्रेत्यांनी अधिकार्‍यांशी वाद घातला.