होमपेज › Goa › रेबीजमुक्‍त गोव्यासाठी १.६४ कोटी होणार खर्च 

रेबीजमुक्‍त गोव्यासाठी १.६४ कोटी होणार खर्च 

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 1:35AMपणजी : प्रतिनिधी

गोव्याला रेबीजमुक्त करण्यासाठी राज्य सरकार येत्या तीन वर्षात एकूण 1 कोटी 64 लाख 2 हजार रुपये खर्च करणार आहे. गोवा  पशूसंवर्धन खात्याने शुक्रवारी नवी योजना अधिसूचित केली आहे. 

‘मिशन रेबीज’ या स्वंयसेवी संस्थेला सरकार रेबीजमुक्त योजनेंतर्गत आर्थिक मदत करणार आहे. या संस्थेेने कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सरकारी मदत न घेता संस्थेेने  2414 कुत्र्यांचे लसीकरण केले. 35 हजार कुत्र्यांविरूद्ध शास्त्रीय उपाययोजना केली असल्याचे संस्थेच्या अहवालात नमूद केले आहे.     

सरकारला पहिल्या टप्प्यात काही खर्च आला नसला तरी दुसर्‍या टप्प्यात खर्च करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.  आता दुसर्‍या टप्प्यात सरकारने वार्षिक 54 लाख 67 हजार रुपये खर्चाची तरतूद केली आहे. रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला फिरणार्‍या कुत्र्यांना पकडून व वाहनात भरुन आणण्यावर हा खर्च होईल. नंतर या कुत्र्यांविरुद्ध शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करणे. तसेच रेबीज झालेल्या कुत्र्यांची विल्हेवाट लावणे यावरही हा खर्च येणार आहे.

रेबीज होणार्‍या कुत्र्यांची संख्या घटल्यास रेबीज झालेला कुत्रा माणसांना चावण्याच्या घटनाही कमी होतीत. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये अधिक एनजीओंना सहभागी करुन घेत या कार्यक्रमावर खर्च करणे सरकारला योग्य वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  यावर्षी म्हणजे 2018 मध्ये गोवा रेबीजमुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट सफल होणे शक्य नाही. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने येत्या तीन वर्षात प्रत्येकी 54 लाख 67 हजार रुपये रेबीजमुक्तीवर खर्च करण्याचे ठरवले आहे. 

राज्यातील कुत्र्यांची संख्या होणार मोजदाद

सरकारने 3 हजार बेवारस कुत्रे असावेत असे अपेक्षित धरले आहे. मात्र, या कुत्र्यांचा नेमका आकडा समजण्यासाठी स्मार्ट फोन व ‘जीपीएस’ तंत्रज्ञान वापरून राज्यातील सर्वच कुत्र्यांची एकूण संख्या किती आहे हे एनजीओकडून शोधण्यात येणार असल्याचे  सरकारी सूत्रांनी सांगितले.