Tue, Apr 23, 2019 07:55होमपेज › Goa › मलनिस्सारण प्रकल्पात इतर भागातील सांडपाणी नको

मलनिस्सारण प्रकल्पात इतर भागातील सांडपाणी नको

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 14 2018 11:35PMम्हापसा  : प्रतिनिधी

मरखाजन म्हापसा येथे होऊ घातलेल्या  मलनिस्सारण  प्रकल्पात पर्वऱी, सांगोल्डा गिरी व इतर परिसरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास म्हापसा  पालिका मंडळाने  आक्षेप घेतला आहे.  म्हापसा येथील मलनिस्सारण प्रकल्पात इतर भागातील सांडपाणी घेऊ नये  व बेकायदेशीरपणे  प्रकल्पाचे बांधकाम हाती घेतल्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करावी, असा  ठराव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत नगरसेवक चंद्रशेखर बेनकर वगळता इतर सर्व नगरसेवक, पालिका  मुख्याधिकारी क्लेन मदेरा,  प्रशासकीय अधिकारी भानुदास नाईक व पालिका अभियंता हुसेन शहा मुजावर उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष मर्लिन डिसोझा यांनी कामरखाजन येथे उभारण्यात येणार्‍या पर्वरी व इतर भागातील अतिरिक्त  मलनिस्सारण प्रकल्पाला विरोध करणारा ठराव मांडला या ठरावास पालिका मंडळाने अनुमती दिली. म्हापशाच्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असतानाच पालिका मंडळाला अंधारात ठेवून या प्रकल्पाच्या बाजूला  मलनिस्सारण व्यवस्थापन महामंडळाने पर्वरी व इतर भागासाठी प्रकल्पाचे बांधकाम हाती घेतल्याबद्दल पालिका मंडळाने आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. 

दुसर्‍या भागातील सांडपाणी म्हापशात का असा सवाल पालिका मंडळाने उपस्थित केला. हा अतिरिक्त प्रकल्प उभारताना म्हापसा कोमुनिदादीने दिलेल़्या ना हरकत दाखल्याचा गैरवापर केल्याचा आरोप नगरसेवक रायन ब्रागांझा यांनी केला. प्रकल्प उभारण्यासाठी आणलेले साहित्य पालिकेने जप्त करावे अशी मागणी पालिका बैठकीत नगरसेवकांनी केली.   हा प्रकल्प उभारण्यास विरोध करून तात्पुरते बांधकाम बंद करणारा आदेश  मलनिस्सारण व्यवस्थापन महामंडळाला देणे व म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्ण़य  पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कामरखाजन भागात दोन मजली इमारत वगळता मल्टीस्टोरेज व त्याहून मोठे प्रकल्प उभारण्यास बंदी घालणारा ठराव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.   या भागातील जागेचे रूपांतर व्यवसायिक जागेत न करता ही जागा सेटलमेन्ट झोनमध्येच राखीव ठेवण्यात यावी, असा ठराव संमत करण्यात आला.  केच्या प्रभागांची संख्या 20 वर गेली असतानाही पालिका कारभार 13 प्रभागानुसारच चालू असून हा कारभार 20 प्रभागवार चालविण्यासाठी पालिकेने जीपीएस प्रणालीद्वारे प्रभागांची सीमा ठरविण्याचा  ठराव पालिका मंडळाच्या बैठकीत घेतला. येथील सेंट झेवियर महाविद्यालयाच्या जीओलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांमार्फत पालिकाक्षेत्रातील सर्व घरांची व चालणार्‍या व्यावसायांची माहिती गोळा करणे व त्यानुसार प्रभागांची सीमा आखण्याचे काम सोपविण्याचे व या कामी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पालिका अधिकार्‍यांंची नियुक्ती करणारा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी पालिकेने खासगी संस्थेतर्फे जीपीएस प्रणालीद्वारे पालिकेच्या दोन प्रभागांचे सर्वेक्षण केले होते. या कामी पालिकेचे 8 लाख रूपये खर्ची पडले होते. सेंट झेवियरचे विद्यार्थ्यी शैक्षणिक प्रकल्प म्हणून हे सर्वेक्षण करणार असून पालिकेचा निधी  वाचणार आहे. असे सांगून या सर्वेक्षणानंतर घर क्रमांकात बदल करावा की नाही याबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येईल असे स्पष्टीकरण नगराध्यक्षांनी दिले.पालिका वाचनालयाचे ग्रंथपाल ज्ञानेश्‍वर पार्सेकर यांना सेवेत घेण्याच्या अटीवर पालिका वाचनालयाचे रूपांतर उत्तर गोवा जिल्हा वाचनालयामध्ये करण्याचा प्रस्ताव कला व संस्कृती खात्याकडे पाठवणे व इतर निर्ण़य पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

Tags : Goa, drainage, plant, does, sewage, other, areas