Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय चुकीचा

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय चुकीचा

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 02 2018 12:44AMदाबोळी ः प्रतिनिधी

मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी पुन्हा सुरू होणार असल्याच्या वृत्ताने वास्कोत खळबळ माजली आहे. जिंदाल कंपनीला पुन्हा कोळसा हाताळणीसाठी परवानगी देण्याच्या प्रकाराविरूध्द आमदार मिलिंद नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढी सहजा सहजी कोळसा हाताळणीसाठी परवानगी मिळेल, असे वाटले नव्हते. हा सारा प्रकार संशयास्पद असून स्थानिक लोक आणि लोकप्रतिनिधीनाही विश्‍वासात घेतलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

सहा महिन्यांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळानेच जेएसडब्ल्यू कंपनीला आरोपी ठरवून त्यांच्या हाताळणीवर बंदी आणली होती. आता ही कंपनी चांगली अशी झाली असा प्रश्‍न उपस्थित करून आमदार नाईक यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही कंपन्यांना दिलेल्या कोळसा हाताळणीच्या परवान्यामुळे पूर्वी इतकेच प्रदूषण निर्माण होणार असून जनतेला त्रास झाल्यास आपण सहन करणार नाही. माल कोणताही असला तरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवून व्यवसाय करण्यास हरकत नाही. परंतु प्रदूषण होणार नाही याची कोणतीही हमी देण्यात आलेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाला जर प्रदूषण मोजायचे असल्यास पावसाळयात ते शक्यच नाही, असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

मात्र, मुरगाव बंदरात या महिन्यापासून कोळसा हाताळणी त्याच गती पुन्हा सुरू होणार असल्याचे वृत पसरल्याने वास्कोत खळबळ माजलेली आहे. जेएसडब्ल्यू कंपनीला दरमहा 4 मेट्रीक टन तसेच अदानी कंपनीला सुध्दा 4 मेट्रीक टन कोळसा हाताळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिरवा कंदील दाखवलेला असून पुन्हा त्याच संख्येने कोळसा हाताळणी होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिंदाल व अदानी कंपनीला येत्या मार्चपर्यंत म्हणजेच 9 महिन्यांसाठीच कोळसा हाताळणीची परवानगी दिलेली असून दर महिना चार लाख टन कोळसा हाताळणी या कंपन्या करतील. त्यामुळे पुन्हा कोळसा प्रदूषणला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नागरिकांमध्ये आता पुन्हा नाराजीचा सूर उमटू लागलेला आहे.

मुरगाव बंदरात आतापर्यंत जिंदाल साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेडला सर्वांधिक कोळसा आयात झालेला आहे. त्यानंतर अदानी उद्योग समुहासाठी मुरगाव बंदरात कोळसा आयात होतो. मुरगाव बंदरात जिंदाल आणि अदानी उद्योगांचे कोळसा हाताळणीसाठी स्वतंत्र धक्के असून यांत्रिकी प्रकल्पावर हा कोळसा हाताळला जातो. जानेवारी महिन्यात गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अचानक आलेल्या आदेशामुळे जिंदालच्या साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेडला कोळसा हाताळणी तडकाफडकी बंद करावी लागली होती. त्यामुळे या कंपनीची आयातही अडकून पडली होती.

साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेडला 7 मेट्रिक टन कोळसा हाताळण्याची मर्यादा होती. परंतु या कंपनीकडून तब्बल 11 मिलियन टन कोळसा हाताळला जात असल्याचा आरोप होता. मंडळाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक कोळसा हाताळणी साऊथ वेस्ट पोर्टकडून होत असल्याचे उघडकीस आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोळसा हाताळणी बंदीची कारवाई केली होती. या निर्णयाविरूध्द साऊथ वेस्ट पोर्टने न्यायालयातही दाद मागितली होती. मात्र, कोळसा हाताळणी पुन्हा सुरू करण्यास या कंपनीला यश आले नव्हते.