Tue, Jul 23, 2019 11:21होमपेज › Goa › विद्यमान भाजप सरकार श्रीमंतांचे

विद्यमान भाजप सरकार श्रीमंतांचे

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 12:57AMपणजी : प्रतिनिधी

पेट्रोल, डिझेलच्या  किंमती वाढत असून पेट्रोल 73.52  रुपये प्रती लिटर वर  पोहचले आहे. विद्यमान भाजप सरकार हे गरीबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असल्याचे दिसते,अशी टीका  मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी पणजी येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

भारतात एका बाजूने पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच दुसरीकडे मात्र   भारत विदेशात   पेट्रोल व डिझेल कमी दरात निर्यात करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सोपटे म्हणाले, अबकारी शुल्कात मागील काही वर्षात करण्यात आलेल्या प्रचंड वाढीमुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ जाणवत आहेत.  2014 साली भाजप सरकार सत्तेत आले,तेव्हा अबकारी शुल्क 211.7 टक्के इतके होते. मात्र   आता म्हणजे मागील साडे चार वर्षात त्यात वाढ होत ते  446.6 टक्क्यां पर्यंत पोहचले आहे.

गोव्यात  2017 साली पेट्रोल 61 रुपये  प्रती लिटर असा दर होता,तर डिझेल  58 रुपये प्रती लिटर इतके होते. मात्र 2018 मध्ये  पेट्रोल दर 73.52 रुपये प्रती लिटर व  डिझेल 72.74  रुपये प्रती लिटर  झाले आहे. देशात  पेट्रोल व डिझेल दरात वाढ झाली असतानाच भारत  विदेसात  पेट्रोल 34 रुपये प्रती लिटर व डिझेल  37 रुपये प्रती लिटर रुपये प्रमाणे निर्यात करीत आहे. चांगल्या गोष्टीचे श्रेय भाजप घेते. परंतु वाईट गोष्टीचे खापर  काँग्रेसच्या माथी मारते,अशी टीकाही त्यांनी केली.

भारताने विदेशात पेट्रोल व डिझेल कमी दरात निर्यात करण्यापेक्षक त्याचा फायदा भारतीयांना द्यावा. महागाईमुळे जनता त्रस्त बनली आहे. जनतेने  विरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचेही सोपटे म्हणाले.

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते अमरनाथ पणजीकर म्हणाले, गोव्याच्या उभरत्या क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यास क्रीडा खात्याला अपयश येत आहे.  आशिया क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या डेन कोएलो व  कातिया कोएलो यांनी विंड सर्फींग मध्ये   भारताचे प्रतिनिधीत्व केले. परंतु  ते जेव्हा गोव्यात परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी क्रीडा खात्याचे  तसेच सरकारच्या वतीने  कुणीच उपस्थित नव्हते अशी टीका त्यांनी केली.

त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा खात्याकडून काहीच करण्यात आले नाही. मात्र  गोवा फॉरवर्डच्या सदस्या तथा मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षांचा पुत्र राहूल प्रभूदेसाई याला क्रीडा खात्याच्या वतीने  माऊंट एव्हरेस्ट चढाईसाठी 23 लाख 55 हजार रुपयांची आर्थिक मदत  देण्यात  आली. यावरुन सरकारने  दुजाभाव करीत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी प्रदेश महिला  काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो,  वरद म्हार्दोळकर, जमीर अहमद, प्रतिभा बोरकयींर व   जॉर्जिना गामा उपस्थित होत्या.