Wed, Sep 18, 2019 19:37होमपेज › Goa › मांडवी पुलावर वाहनांची  गर्दी; पर्वरीत वाहतूक कोंडी

मांडवी पुलावर वाहनांची  गर्दी; पर्वरीत वाहतूक कोंडी

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 30 2017 12:25AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

नववर्षाच्या स्वागतासाठी  अवघा एक दिवस उरला असून यानिमित गोव्यात पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. देशी पर्यटकांची संख्या वाढत असल्याने रस्ते वाहतुकीवर बराच ताण वाढला असून मांडवी पुलावर शुक्रवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते. पर्वरीत यामुळे सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली.

31 डिसेंबरला रविवार असल्याने नववर्ष स्वागतासाठी येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत आणखी भर पडण्याची अपेक्षा आहे. पेडण्यापासून काणकोणपर्यंतचे सर्व समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेले आहेत. संध्याकाळच्या वेळी तर मांडवी तसेच झुवारी पुलांवर वाहनांच्या  लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे  एक कि.मी.चे अंतर  पार करण्यासाठी देखील  वाहन चालकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागत आहे.

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे  राज्यात अनेक ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे  वाहतूक पोलिसांना बरीच कसरत करावी लागत आहेत. वाहतूक व्यवस्थापनाच्या या कामात वाहतूक पोलिसांना गृहरक्षकांची साथ लाभत आहे. वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी जादा संख्येने गृहरक्षकही तैनात करण्यात आल्याचे दिसून येत आहे.