Fri, Jul 19, 2019 19:56होमपेज › Goa › पोर्तुगीजकालीन 80 पुलांची स्थिती बिकट

पोर्तुगीजकालीन 80 पुलांची स्थिती बिकट

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी  

राज्यातील पोर्तुगीजकालीन सुमारे 80 पुलांची स्थिती बिकट असून त्यांची दुरुस्ती त्वरित हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी   येथे तिसर्‍या मांडवी पुलाच्या स्लॅब बसवण्याच्या कार्यक्रमावेळी दिली. राज्यातील पोर्तुगीजकालीन पुलांच्या ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’चे काम सरकारने  मागील वर्षापासून हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री ढवळीकर म्हणाले, या ऑडिट अंतर्गत आतापर्यंत सुमारे 80 पोतुर्र्गीजकालीन पुलांची स्थिती वाईट असल्याचे आढळून आले आहे. यात  बहुतेक नाल्यांवरील पुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून उत्तर गोव्यातील पुलांचे ऑडिट पूर्ण करण्यात आले असून दक्षिण गोव्यातील पुलांचे ऑडिट अद्याप हाती घेण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील सर्व पुलांचे ऑडिट पूर्ण करण्यासाठी आणखी  एका वर्षाचा कालावधी लागेल. ज्या पुलांची स्थिती अत्यंत वाईट आहे त्यांची पुनर्बांधणी केली जाईल तर उर्वरीत पुलांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती केली  जाईल. राज्यातील 30 वर्षांहून अधिक कालावधीच्या पुलांचे ऑडिट हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.काही राजकीय नेते स्वत:च्या  लाभासाठी सरकारी प्रकल्पांत हस्तक्षेप करीत असल्याने ते अडून राहिले आहेत. जनतेला तसेच राजकीय नेत्यांना जर हे प्रकल्प नको असतील तर ते थांबवले जातील, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.