Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Goa › पणजीत ‘वॉकिंग ट्रॅक’वर झाडांचा अडथळा

पणजीत ‘वॉकिंग ट्रॅक’वर झाडांचा अडथळा

Published On: Jul 06 2018 1:31AM | Last Updated: Jul 05 2018 11:43PMपणजी : प्रतिनिधी

कांपाल येथील ‘साग’ (गोवा क्रीडा प्राधिकरण) मैदानाच्या मागील बाजूस ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मॉर्निंग वॉक’करिता बांधण्यात आलेल्या पदपथ व ‘वॉकिंग ट्रॅक’ची दुर्दशा झाली आहे. सुमारे सात ते आठ भली मोठी झाडे  पदपथालगतच्या वॉकिंग ट्रॅकवर कोसळली आहेत. ही झाडे त्वरित हटवावीत, अशी मागणी दररोज या ठिकाणी ‘मॉर्निंग वॉक’ साठी  जाणार्‍या रहिवाशांनी केली आहे.     

पदपथालगतच्या वॉकिंग ट्रॅकवर गेल्या महिन्याभरापासून झाडे पडून आहेत व याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ‘मॉर्निंग वॉक’ साठी जाणार्‍या ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य लोकांना याचा अडथळा होत आहे. तसेच  पदपथालगत धोकादायक झाडेदेखील असल्याने या जागेची पाहणी करणे आवश्यक आहे. पन्नासहून अधिकजण सकाळच्या वेळी येथे फिरण्यासाठी येतात. हे ठिकाण ‘वॉकिंग’साठी उपयुक्त असून ठिकठिकाणी पडलेल्या झाडांमुळे मात्र गेले काही दिवस त्रास सोसावा लागत आहे. सकाळच्या वेळी पणजीतील ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी, तसेच विरंगुळ्यासाठी हे एकमेव ठिकाण असल्याने पणजी महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे, असे ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.