Wed, Nov 14, 2018 10:27होमपेज › Goa › फरार संशयित गुज्जरला अटक

फरार संशयित गुज्जरला अटक

Published On: May 21 2018 1:17AM | Last Updated: May 21 2018 1:17AMमडगाव : प्रतिनिधी

बसुराज बाकडी खूनप्रकरणी  दोन महिने पोलिसांना गुंगारा देणारा   मुख्य संशयित आदित्य प्रेमराज गुज्जर (19) याला   सोशल मीडिया अर्थात फेसबुकच्या साहाय्याने गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेण्यात कुडचडे पोलिसांना यश आले आहे. 

कुडचडे पोलिस स्थानकाचे निरीक्षक रवी देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रपुरम पोलिसांच्या मदतीने त्याला वैशाली सेक्टर गाझियाबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार गोकुळदास गावकर आणि पोलिस कॉन्स्टेबल धीरज नाईक यांचे पथक गाझियाबाद येथे पाठविण्यात आले होते. शनिवार दि.19 रोजी रात्री पावणेबारा वाजता त्याला पकडण्यात आले.

गेले दोन आठवडे कुडचडे पोलिस गुज्जर याच्या मागावर होते. पण त्याने आपला मोबाईल बंद  ठेवल्याने पोलिसांसमोर त्याला पकडण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन त्याचा ठावठिकाणा शोधून  काढला. तो गाझियाबाद येथे असल्याचे समजताच खास पथक पाठवून त्याला ताब्यात घेण्यात आले. 

बाकडी याचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे अनमोड घाटात फेकून दिल्यानंतर गुज्जरने आपल्या मूळ गावी गाझियाबादकडे पलायन केले होते. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुडचडे पोलिसांनी गुज्जर याला ताब्यात घेतले.

      बसुराज याची पत्नी संशयित कल्पना हिच्याशी आदित्यचे मैत्री पूर्ण संबध होते. 2 एप्रिल रोजी कल्पना बाकडी, अब्दुल शेख, सुरेश कुमार, पंकज पवार आणि आदित्य गुज्जर यांनी बसुराजचा निर्दयीपणे खून करून मृतदेहाचे तुकडे अनमोड घाटात फेकले होते. तब्बल एका महिन्यानंतर एका महिलेने या प्रकरणाची माहिती कुडचडे पोलिसांना दिली होती.पोलिसांनी गुज्जर वगळता अन्य चारही जणांना अटक केली होती. मात्र, खून करून दुसर्‍याच दिवशी  गुज्जरने कुडचडेतून पलायन केले होते.खुनाचा  प्रकार उघडकीला आल्यानंतर पोलिसांनी गुज्जर याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी सापळे रचले होते. बसुराज  खून प्रकरणात त्याचा प्रमुख सहभाग होता.