Sat, Apr 20, 2019 08:37होमपेज › Goa › सांत इनेज पूल १८ जूनला होणार खुला

सांत इनेज पूल १८ जूनला होणार खुला

Published On: Jun 04 2018 1:37AM | Last Updated: Jun 04 2018 1:30AMपणजी : प्रतिनिधी

लाल फितीच्या कारभारात तब्बल दीड वर्षे रेंगाळलेला सांत इनेज खाडीवरील पूल अखेरीस पूर्ण झाला आहे. सुमारे 2.73 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या  पुलापासून  पणजीतील महत्वाच्या ऐतिहासिक 18 जून मार्गाचा प्रारंभ होत असल्याने तो 18 जून रोजीच खुला केला जाईल, अशी माहिती आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली. 

सांत इनेज खाडीवरील सदर पूल अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असून पुलाजवळून मनपा मार्केट, 18 जून रस्ता आणि सांत इनेज भाग एकत्रित येतो. हा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. सुरुवातीला या पुलाच्या जागी ‘बॉक्स कलवर्ट’ (चौकोनी सिमेंटचा सांगाडा) बांधण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र त्यामुळे सांत इनेज खाडीतील जलप्रवाह रोखला     

जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने या जागी पूर्ण क्षमतेचा पूल बांधण्याचे ठरविण्यात आले. या पुलाचे काम गोवा साधन सुविधा महामंडळाकडे (जीएसआयडीसी) देण्यात आले असून त्याचा आधीचा खर्चाचा अंदाज 2.02 कोटी रूपयांचा  होता, मात्र तो वाढून प्रत्यक्षात 2.73 कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या पुलाच्या कामासंबंधी कुंकळ्येकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, या पुलाच्या आराखड्यामध्ये बदल करण्यात आल्याने आधीच्या खर्चात आता वाढ झाली आहे. या पुलाचा आराखडा बदलण्यात आला असून आधीच्या  ‘बॉक्स कलवर्ट’च्या जागी अर्धवर्तुळाकार आकाराचा पूल  उभारण्यात आला आहे. यामुळे या पुलाखालून पाण्याचा प्रवाह अखंड  राहून  लहान होड्यांची ये-जा करणेही शक्य होणार आहे. या पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून केवळ पुलाच्या दोन्ही बाजूच्या पदपथांवर ‘पेव्हर्स’ आणि विजेचे खांब बसवण्याचे काम उरले आहे.