Mon, Nov 19, 2018 23:58होमपेज › Goa › ‘सेझ’ भूखंड परत घेणार

‘सेझ’ भूखंड परत घेणार

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 27 2018 12:20AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये ‘विशेष आर्थिक विभाग’ च्या (सेझ) नावाखाली पडून असलेली सुमारे 38 लाख चौरस मीटर्स जमीन परत घेण्याची तयारी सरकारने चालवली आहे. ‘सेझ’ प्रवर्तकांना सुमारे 300 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून अदा करून सदर भूखंड परत मिळवण्याचा निर्णय गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) घेतला असल्याचे आयडीसीचे अध्यक्ष तथा आमदार ग्लेन टिकलो यांनी सांगितले. 

राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील काही औद्योगिक वसाहतींमध्ये तत्कालीन  काँग्रेस सरकारच्या कालावधीत सात ‘सेझ’क्षेत्रांसाठी 38 लाख चौरस मीटर्स क्षेत्रफळाचे भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. राज्यातील वेर्णा, सांकवाळ, केरी आदी ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीत  भूखंड उद्योजकांना वितरीत करण्यात आले होते, असे सांगून   टिकलो म्हणाले की, महामंडळाने गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सातपैकी पाच ‘सेझ’ प्रवर्तकांना सुमारे 300 कोटी रुपयांची नुकसान भरपाई ‘सर्वमान्य तोडगा’ म्हणून अदा करून सदर भूखंड परत घेण्याचे निश्‍चित केले आहे. सदर ‘सेझ’ प्रवर्तकांनी केलेल्या गुंतवणुकीच्या  रकमेत 9 टक्के व्याज धरून 300 कोटी रूपये देण्याची सरकारने तयारी दाखवली आहे. 

सर्वोच्च न्यायालयासमोर येत्या 24 जुलै रोजी होणार्‍या सुनावणीत समझोत्याचा हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.