Thu, Nov 22, 2018 17:10होमपेज › Goa › मुलांना व्यसनापासून रोखण्याची आवश्यकता

मुलांना व्यसनापासून रोखण्याची आवश्यकता

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 11:39PM

बुकमार्क करा

फोंडा : वार्ताहर

मुलांना व्यसनापासून  रोखण्यासाठी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फोंडा येथे केले. राजीव गांधी कला मंदिराच्या सभागृहात श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या 15 व्या गोमंतक महिला साहित्य संमेलन व रौप्य महोत्सवी सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. 

प्रमुख वक्‍ते म्हणून लेखक रमेश पतंगे, कला व सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष  प्रा. अनिल सामंत, अजित केरकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. पौर्णिमा उसगावकर, संगीता अभ्यंगकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की वाचनातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. मात्र, नवी पिढी वाचनापासून दुरावत असल्याने पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवून चांगले संस्कार करण्याची गरज आहे. तरुणांना ड्रग्स व नैराश्येपासून मुक्‍त करण्यासाठी सरकारतर्फे समुदेशन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सुमारे 15 ते 18 टक्के युवक नैराश्येचे जीवन जगत असल्याचे दिसून येत आहे.

रमेश पतंगे म्हणाले, की पूर्वी जगाच्या नकाशावर भारतातून 30 टक्के व्यापारीकरण होते. मात्र, शारदेच्या उपासनेमुळे देश सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात आहे. ज्ञान ही 21 व्या शतकाची खरी ताकद आहे. विविध संस्थांनी शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेची प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करण्याची गरज आहे.

मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले, की वाचनातून ज्ञान वाढत असल्याने युवकांनी वाचनाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. 

अनिल सामंत म्हणाले, की प्रत्येक पालकाने पुस्तकांचे महत्त्व आपल्या मुलांना पटवून देण्याची गरज आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते संस्थेच्या सात संस्थापक महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. संगीता अभ्यंकर यांनी स्वागत केले. डॉ. पौर्णिमा उसगावकर यांनी प्रास्ताविक केले.