होमपेज › Goa › ‘लोकोत्सव २०१८’ला आजपासून प्रारंभ

‘लोकोत्सव २०१८’ला आजपासून प्रारंभ

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:23AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

पणजीतील कला अकादमीच्या दर्या संगमावर गोवा राज्य कला व संस्कृती संचालनालयातर्फे शुक्रवार दि. 12 ते  रविवार दि. 21 जानेवारी पर्यंत 19 वा ‘लोकोत्सव-2018’ होणार असल्याने आयोजकांकडून दमदार तयारी करण्यात आली आहे. या लोकोत्सवाचा शुक्रवारी प्रारंभ होणार असून यात विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रमांचे कला दर्शन घडणार आहे.

लोकोत्सवात 650 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. तब्बल पाच विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजनही केले जाणार आहे, लोकोत्सवचे उद्घाटन शुक्रवार दि.12 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सचिव दौलत हवालदार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. लोकोत्सवात गोमंतकीय व इतर राज्यांतील सुमारे 500 ते 550 कलाकार सहभागी होतील.

यंदा 300 कलात्मक गोष्टींचे स्टॉल्स, 50 खाद्यपदार्थांचे, इतर वस्तूंचे 200 स्टॉल्स  व गोमंतकीयांचे स्टॉल्स वाटपाची आखणी करण्यात आली आहे. यात गोमंतकीयांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे एक स्टॉल दोघांत विभागून देण्यात येणार आहे. गोमंतकीय व इतर राज्यांच्या संस्कृती व कलाकारांना व्यासपीठ मिळावे हा लोकोत्सवाचा मुख्य हेतू आहे.  

लोकोत्सवात मातीचे दागिने, सुकी फुले, कागदी हस्तकला व पाककला आदी विषयांवर खास कार्यशाळांचे आयोजन केले आहे. आदिवासींची गीते, नृत्य, संगीत, कला, हस्तकलेचे दर्शन लोकोत्सवात होणार आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, गोवा कला अकादमी, गोवा क्रीडा प्राधिकरण, पणजी महानगरपालिका, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि कला-संस्कृती खाते, झारखंड यांच्या सहकार्याने लोकोत्सवाचे आयोजन होत आहे. 

आकर्षक लोकनृत्यांचे सादरीकरण 

लोकोत्सवात विविध लोकनृत्ये सादर करण्यात येणार आहेत. लोककला सादरीकरणासाठी मंचाचीही उभारणी करण्यात आली आहे. चाळीसांवर आकर्षक लोकनृत्यांचे सादरीकरण होणार आहे. दर्जेदार लोकनृत्यांप्रमाणेच दिमाखदार रंगमंचही उभारण्यात आला आहे. लोकोत्सवाच्या प्रत्येक दिवशी सायंकाळी 6.30 ते 9.30  या वेळेत दर्यासंगमवर लोककलेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.