होमपेज › Goa › खाणबंदीवर काँग्रेसचा आज तोडगा

खाणबंदीवर काँग्रेसचा आज तोडगा

Published On: May 30 2018 2:17AM | Last Updated: May 29 2018 11:46PMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात खाणबंदी लागू  होऊन दोन महिने उलटूनही खाणी सुरू व्हाव्यात यासाठी भाजप आघाडी  सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. राज्य सरकारचे मंत्री - आमदार अनेक तर्कवितर्क लढवीत असले तरी कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. यामुळे  आता काँग्रेस पक्षातर्फे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती तज्ज्ञ वकिलांशी सल्लामसलत करून बुधवारी (दि.30) खाणबंदीवर तोडगा सुचवणार आहे, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.

पर्वरी येथे काँग्रेस विधिमंडळ गटाची मंगळवारी संध्याकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर कवळेकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, काँग्रेसच्या ‘नमन तुका गोंयकारा’ मोहिमेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध ठिकाणी जनतेच्या समस्या आणि प्रश्‍न समजून त्यावर उपाय शोधण्याचे काम काँग्रेस पक्ष करणार आहे. यात, खाणग्रस्त भागातही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी खाण अवलंबितांची बेरोजगारी, पाणी आदी समस्या प्रखरतेने जाणवल्या. खाणबंदी होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी त्यावर कोणतीही उपाययोजना सरकारतर्फे केली जात नाही, अशा तक्रारी लोकांनी स्पष्टपणे मांडल्या. खाणबंदीवर तोडगा काढण्याबाबत भाजप आघाडी सरकारातील अनेक मंत्री-आमदार, खासदार तसेच भाजपचे प्रवक्‍ते वेगवेगळे मत व्यक्‍त करत आहेत.

मात्र, त्यात एकवाक्यता आणि ठामपणा आढळत नसल्याने जनतेत गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यात बंद पडलेल्या खाणी लवकरात लवकर सुरू व्हाव्यात, अशी काँग्रेसची आजवरची भूमिका कायम असून त्याबाबत राज्य सरकारलाही बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र, सरकारच्या निष्क्रीयतेमुळे आता काँग्रेस पक्षानेच पुढाकार घेऊन स्वत: तज्ज्ञ वकिलांकडे तसेच अनुभवी व्यक्‍तींशी चर्चा करून  तोडगा काढण्याचे ठरविले आहे. 

हा तोडगा सरकारला लवकरच अधिकृतरित्या कळवला जाणार असून सदर तोडगा जर मर्यादित काळात राज्य सरकारने स्वीकारला नाही, तर काँग्रेस पक्षाचे  कार्यकर्ते सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरतील, असा इशारा कवळेकर यांनी दिला. विधिमंडळ गटाच्या बैठकीत विरोधी काँग्रेसच्या 16 आमदारांच्या मतदारसंघात विकासकामे डावलली जात असल्याबद्दल काही आमदारांनी नाराजीही व्यक्‍त केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेेसच्या आमदारांना प्रत्येकी 15 कोटी रूपयांची विकासकामे करण्याचे आश्‍वासन देऊन अधिकार्‍यांना निविदा काढण्याचाही आदेश दिला होता. या कामांबाबत सरकारकडून काय पावले  उचलली गेली आहेत, यावर ढवळीकर यांना विचारणा करण्याचे विधिमंडळ गटाच्या बैठकीत ठरल्याचे कवळेकर यांनी सांगितले. 

माजी एजी अ‍ॅड. कंटक यांच्यासमवेत आज बैठक

खाणबंदीवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते प्रतापसिंह राणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती मागील अनेक दिवसांपासून खाणबंदीबाबत लोकांकडून तसेच कायदेतज्ज्ञांकडून सूचना आणि मते  जाणून घेत आहे. या समितीची बुधवारी (दि.30) संध्याकाळी 4 वाजता राज्याचे माजी अ‍ॅटर्नी जनरल  अ‍ॅड. सुबोध कंटक आणि अनुभवी कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. मनोहर उसगावकर यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर खाणबंदीबाबत सरकारने कोणती भूमिका घ्यावी यावर तोडगा सुचवला जाणार आहे