गोवा : राज्यकृषी मंत्र्यांनी केंद्राकडे मांडली राज्याची कैफियत

Last Updated: Apr 10 2020 5:42PM
Responsive image


पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील काही ठिकाणी हंगामातील भातपीक सध्या कापणीला आले आहे. यासाठीचे कम्बाईन्ड हार्वेस्टर चालवायला यंत्रचालक शेजारच्या राज्यातून येत असतात. संचारबंदीमुळे त्यांना राज्याच्या सीमा १४ दिवस क्वारंटाईन झाल्याशिवाय ओलांडता येणार नाहीत. राज्यात संचारबंदीमुळे भाताच्या कापणीला फटका बसला आहे, ही शेतकर्‍यांची अडचण उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मांडली. या बैठकीत देशातील सर्व कृषी मंत्री व कृषी विभागाचे सचिव उपस्थित होते. 

गोवा : कोकण रेल्वेचे आरक्षण सुरु, पण...

ही बैठक देशभरातल्या संचारबंदीमुळे सर्व राज्यांतल्या कृषी विभागांवर होणार्‍या परिणामांवर चर्चा करण्यासाठी तातडीने बोलाविण्यात आली होती. यावेळी इतर राज्यांनी देखील संचारबंदीच्या काळातील शेतकर्‍यांसाठी आपण करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली व आपल्या कैफियतीही मांडल्या. 

गोव्यातील काँग्रेसचे आमदार वेतनातील ३० टक्के रक्कम मदत निधीसाठी देणार

मंत्री कवळेकर म्हणाले, की राज्यात जे ०४ कम्बाईन्ड हार्वेस्टर चालू आहेत ते व राज्यातील मजुरांच्या सहाय्याने कापणी करायला घेतल्यास वेळ लागणार असून शेती करपून जाण्याची भीती आहे. या संचारबंदीचा राज्यातील फूल उत्पादकांनाही फटका बसलेला आहे. राज्यात ऑर्चिडसारख्या फुलांचे जे उत्पादन करतात ते इतर राज्यांमध्ये पाठवत असतात, जे सध्या शक्य होत नाही. कृषी खात्यामार्फत या फुल उत्पादकांच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे दिशानिर्देश दिले आहेत. 

गोवा : एका रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह 

कवळेकर यांनी यावेळी गोवा फलोत्पादन महामंडळातर्फे घरपोच भाजीपाल्याची सोय केली असल्याचे सांगितले. कोविड -१९ ची देशव्यापी संचारबंदी लागण्याअगोदरच राज्यात सर्व तयारी होती व संचारबंदीला सुरवात झाली होती. त्यामुळेच राज्यात आत्तापर्यंत केवळ ७ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यातील एकजण बराही झालेला आहे. अन्य रुग्ण देखील आता बरे होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

या बैठकीला कृषी खात्याचे सचीव कुलदीप सिंग गांगर, कृषी खात्याचे संचालक नेव्हील आफोंसो, सहकारी संस्थांचे निबंधक विकास गवणेकर उपस्थित होते.

‘गोवा : राज्य शासनाने परिचारिकांना पुरविल्या सर्व सुविधा’